पश्तुनींची भारताला साथ!

    07-May-2025
Total Views |
 
Pashtuns support for India
 
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली. अन्य राष्ट्रांनीसुद्धा हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला. भारतानेही जल, वायू, व्यापार आणि डिजिटल अशा सर्वच माध्यमातून पाकिस्तानची कोंडी केली. एवढेच नाही तर पाकिस्तानच्या अंतर्गतही पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिक, बलुची, पश्तुनी, सिंधी अशा तेथील पंजाब सोडल्यास प्रत्येक प्रांतातील समुदायांनी पाकिस्तानविरोधात दंड थोपटले आहे.
 
पाकच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतातही ‘तहरीक-ए-तालिबान’चे वर्चस्व. तिथल्याच मशिदींनी सद्यस्थितीत भारत-पाक संघर्षात भारतीय सैन्याला पाठिंबा जाहीर केला. मशिदीतील एका मौलानाने केलेल्या घोषणेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला. ज्यामध्ये ते मशिदीतून घोषणा करतात की, ‘मी कुराणची शपथ घेऊन सांगतो की, जर भारताने हल्ला केला तर आम्ही भारतीय सैन्याला पाठिंबा देऊ.’ हा त्याच खैबर पख्तूनख्वामधील व्हिडिओ आहे, जिथे पाकिस्तानी सैन्याने स्थानिक लोकसंख्येविरुद्ध क्रूर कारवाया केल्याचे दाखले आहेत. बलुचिस्तानप्रमाणे शेकडो लोकांना पाक सैन्याने बेपत्ता केल्याच्याही नोंदी आहेत. ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’च्या अहवालानुसार, 2011 सालापासून दहा हजारांहून अधिक बलुच लोक बेपत्ता आहेत.
 
बलुच लोकांचा असा विश्वास आहे की, ते एकतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांच्या ताब्यात आहेत किंवा त्यांची हत्या करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याने पश्तुनींचे केलेले हालही ते कधीच विसरू शकत नाही. प्रत्येक कुटुंबाने दोन ते तीन लोक गमावले आहेत. पश्तुनींची मुले ज्याप्रकारे रडतात, ज्या वेदना सोसतात, त्याचप्रकारे पाकिस्तानी सैन्याच्या मुलांनीही रडले पाहिजे, अशा भावना पश्तुनींकडून व्यक्त होतात. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याने हजारो लोकांना बेपत्ता केले, त्यात अनेकजण मारले गेले. त्यामुळे या दोन्ही प्रांतांमध्ये पाकिस्तानी सैन्य आणि सरकारविरुद्ध प्रचंड रोष खदखदतो आहे. म्हणूनच स्वतंत्र पश्तुनिस्तानची मागणी ही जुनी आहे.
 
स्वतंत्र पश्तुनिस्तान स्थापन करू इच्छिणार्‍या गटांना अफगाणिस्तानने संरक्षण दिले, ज्यामुळे 1950 सालच्या दशकात दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. अफगाणिस्तानातील ‘मुजाहिद’ चळवळीनंतर तालिबानने ही मागणी गुंडाळली आणि पाकिस्तानात आश्रय घेतला. त्यावेळी पाकिस्तान अमेरिकेच्या संरक्षणाखाली होता. अशा परिस्थितीत तालिबान पाकिस्तानमधून आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यात व्यस्त राहिला. 2021 साली जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली, तेव्हा त्यांना पाकिस्तानची चाल लक्षात आली. तालिबानलाही कळून चुकले की, पाकिस्तानमध्ये आता काहीच राहिलेले नाही आणि त्याचा अफगाणिस्तानला काहीही फायदा होणार नाही. अशा परिस्थितीत, तालिबानने पुन्हा एकदा पश्तुनिस्तान चळवळीला खतपाणी घालण्यास सुरुवात केली.
 
पश्तुनिस्तान चळवळीला तालिबानचा पाठिंबा पाहून पाकिस्तान पुरता ओळखून आहे. कारण, तालिबानच्या पश्तुनिस्तान चळवळीमुळे पाकिस्तानचे अस्तित्व धोक्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 साली अफगाण तालिबानचा ड्युरंड रेषेवरील वादाला त्यांचा प्रवक्त्या जबिउल्लाह मुजाहिद याने दुजोरा दिला. मुजाहिदने पुन्हा सांगितले होते की, ड्युरंड रेषेचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यांनी पाकिस्तानने सीमेवर कुंपण घालण्याची तुलना पश्तुनिस्तानच्या देशाचे विभाजन करण्याशी केली. म्हणून, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव हे दर्शवितो की, इस्लामाबादचे काबूलशी व्यवहाराचे धोरण अपयशी ठरले आहे.
 
वास्तविक पाकिस्तानने जबरदस्तीने बलुचिस्तानला समाविष्ट केल्यापासून तो प्रदेश धगधगतो आहे. बलुच हे वेगळ्या राष्ट्रीयत्वाचे लोक आहेत आणि ते स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी सतत लढत आहेत आणि या प्रक्रियेत ते पाकिस्तानच्या सैन्याच्या दडपशाहीचे बळी ठरले आहेत. एकूणच दहशतवादाला खतपाणी घालण्याचे काम पाकिस्तान यापूर्वीही करत होता आणि आताही करतो आहे. ज्या विरोधात पाकिस्तानातील बहुतांश प्रांतातील लोक आवाज उठवत आहेत. हे चित्र स्पष्टपणे सांगते की, जिनांंचा देश केवळ बाहेरूनच नाही, तर आतूनही विखुरलेलाच!