पाकिस्तान हे दहशतवादाचे जागतिक शरणस्थळ, दहशतवाद प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करणे आवश्यकच – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

07 May 2025 18:23:18
पाकिस्तान हे दहशतवादाचे जागतिक शरणस्थळ, दहशतवाद प्रशिक्षण केंद्रे उध्वस्त करणे आवश्यकच – परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

नवी दिल्ली,  परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.


परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, पहलगामवरील हल्ला जम्मू आणि काश्मीरमधील सामान्य स्थिती परत येण्याच्या उद्देशाने घडवण्यात आला होता. पहलगाममधील हल्ला अत्यंत क्रूरतेने भरलेला होता, ज्यामध्ये बहुतेक बळींना जवळून आणि त्यांच्या कुटुंबासमोर डोक्यात गोळ्या घालून मारण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना जाणूनबुजून हत्येच्या पद्धतीने मानसिक धक्का देण्यात आला होता, तसेच त्यांनी भारत सरकारला संदेश देण्यासाठीही या हल्ल्याचा वापर केला. त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये सामान्य स्थिती परत येऊ नये, या उद्देशाने हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याद्वारे भारतात सांप्रदायिक दंगली भडकविण्याताही त्यांचा उद्देश होता, असे ते म्हणाले.


विक्रम मिस्री म्हणाले की भारतीय गुप्तचर संस्था दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवून आहेत. गुप्तचर यंत्रणेने असे सूचित केले आहे की भारताविरुद्ध आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, प्रतिबंध करणे आणि रोखणे दोन्हीही आवश्यक होते. म्हणूनच गुरुवारी सकाळी भारताने अशा सीमापार दहशतवादाला रोखण्यासाठी प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला. भारताची कारवाई नियोजनबद्ध, प्रमाणबद्ध आणि जबाबदार होती. याद्वारे दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


हलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि योजना आखणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक होते. मात्र, पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानकडून त्यांच्या क्षेत्रातील दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधांविरुद्ध कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. परिणामी बुधवारी सकाळी, भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ले केले. यामध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (पीओजेके) मधील पाच ठिकाणी हल्ले केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने संयुक्तपणे ही कारवाई केली आणि सर्व नऊ ठिकाणांवर हल्ले यशस्वी झाले. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात सहभागी असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय सैन्याने ही ठिकाणे निवडली, असेही परराष्ट्र सचिवांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
Powered By Sangraha 9.0