'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला!

07 May 2025 07:53:48

Operation Sindoor

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Operation Sindoor against Pakistan)
काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्र दोनच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरमधील काही भागांत एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांची एकूण नऊ ठिकाणे उध्वस्त केल्याची माहिती आहे. यास पहलगाम हल्ल्याचा हा भारताने घेतलेला बदला म्हणता येईल.  
 
संरक्षण मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली. आज पाकिस्तान सीमेवर मोठ्या प्रमाणात युद्धाभ्यास करणार असताना भारतीय लष्कराने हे पाऊल उचलले. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत ही कारवाई केली. संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय सैन्याने ज्या दहशतवादी तळांपासून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले आखले आणि निर्देशित केले गेले त्या दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने रात्री १:१० ते १:२० च्या दरम्यान पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचे भावलपूरमधील कार्यालय, मुझफ्फराबाद सेंट्रल ग्रिड सिस्टम आणि हाफिज सईदचे मरिदके येथील कार्यालय यासह नऊ ठिकाणी हल्ला करण्यात आला. दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी विशेष अचूक शस्त्रे वापरली गेली. तिन्ही दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि लष्करच्या वरिष्ठ नेतृत्वाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने हल्ल्यांसाठी हे ठिकाण निवडले होते.
 
ऑपरेशन सिंदूरनंतर सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ येथील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. 
 
  
Powered By Sangraha 9.0