खर्गे, राहुल गांधी, शरद पवार सर्वांनीच केलं ऑपरेशन सिंदूरचं समर्थन... वाचा काय म्हणाले विरोधी पक्ष नेते?

07 May 2025 16:41:11
Kharge, Rahul Gandhi, Sharad Pawar all supported Operation Sindoor... Read what opposition party leaders said?

नवी दिल्ली : पाहलगाम येथील क्रुर हल्ल्यानंतर केंद्र सरकारने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या निर्णायक कारवाईला देशातील सर्वच पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. विरोधी पक्षांपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी (श.प.), शिवसेना (उ.बा.ठा), आम आदमी पार्टी आणि इतर प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय लष्कर आणि वायुदलाने एकत्रित पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद आणि मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले.

एकूण नऊ दहशतवादी केंद्रांना संपवणायात करण्यात आले. या कारवाईचे काँग्रेसने समर्थन केले. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर लिहिले, “आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!” काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशि थरूर यांनीही म्हणाले, “सरकारने केलेली ही कारवाई योग्य आणि आवश्यक आहे. सध्या देशाने एकत्र उभे राहणे आवश्यक आहे.”
काँग्रेसचे नेते पवन खेडा म्हणाले की, “कोणत्याही भारतीय नागरिकाला धोका दिला गेला, तर त्याला उत्तर मिळेलच. लष्कराने ते पुन्हा सिद्ध केले आहे. २२ एप्रिलच्या रात्रीच आम्ही सरकारसोबत उभे राहणार असल्याचे जाहीर केले होते. सरकार बरोबर देश आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही लष्कराच्या कृतीच कौतुक करत म्हणाले, “पाहलगाम हल्ल्याच्या दिवसापासूनच काँग्रेस पक्ष लष्कर आणि सरकारसोबत ठामपणे उभा आहे. देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेला कोणताही निर्णायक निर्णय आम्ही समर्थित करतो.”
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प. गट)चे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांनीही याबद्दल पत्रकार परिषद घेतली होती. अशा प्रकारच्या दहशतवादी कारवायांना भारतीय सैन्य प्रत्युत्तर देईल. त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. भारतीय सैन्यदलाने नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत कुठल्याही पाकिस्तानच्या नागरिकांना इजा पोहोचलेली नाही. अतिरेक्यांच्या नऊ लक्षांवर अचूक हल्ला करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया खासदार शरद पवारांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0