मुंबई : (Operation Sindoor) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या १५ दिवसांत देशभरातील वातावरण तापल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलाने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 'या' नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक:
१) मरकझ सुभान अल्लाह, बहावलपूर - जैश-ए-मोहम्मद (मुख्यालय)
२) मरकज तैयबा, मुरीदके - लष्कर-ए-तैयबा
३) सरजल, तेहरा कलान - जैश-ए-मोहम्मद
४) मेहमूना जोया, सियालकोट - हिज्बुल मुजाहिदीन
५) मरकज अहले हदीस, बर्नाला - लष्कर-ए-तैयबा
६) मरकज अब्बास, कोटली - जैश-ए-मोहम्मद
७) मस्कर राहिल शाहिद, कोटली - हिज्बुल मुजाहिदीन
८) शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद - लष्कर-ए-तैयबा
९) सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद - जैश-ए-मोहम्मद