उमरेड दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ३५ लाखांची मदत

07 May 2025 18:01:35
Approval of Rs 35 lakhs to the families of those killed in the Umred accident


मुंबई : नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एमआयडीसीमध्ये असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. या ॲल्युमिनियम फॉईल फॅक्टरीमध्ये दि. ११ एप्रिल २०२५ रोजी स्फोट होऊन ७ कामगारांचा मृत्यू झाला. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून ३५ लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.


रामेश्वर नाईक म्हणाले, उमरेड एमआयडीसीमधील ॲल्युमिनियम फॉइल फॅक्टरीत दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण स्टोट होऊन ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमी झालेल्या रुग्णांची थेट रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी जखमींच्या नातेवाईकांशी चर्चाही केली. भेटीदरम्यान ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले आहेत अशा कुटुंबांसोबत राज्य शासन खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासनही दिले होते. त्यानुसार मृतांच्या कुटुंबांतील वारसाला ५ लाख रुपये, अशा रितीने ७ कुटुंबियांना ३५ लाख रुपयांची मदत वितरीत करण्याची कार्यवाही पूर्ण केली गेली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

ही मदत केवळ आर्थिक आधार नसून, कठीण काळात सरकार नागरिकांच्या पाठीशी उभे असल्याचे प्रमाण आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून या कुटुंबांना काही अंशी दिलासा मिळावा यासाठीचा हा प्रयत्न आहे, असे रामेश्वर नाईक यांनी म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0