नवी दिल्ली :(Waqf Amendment Act 2025) वक्फ सुधारणा कायदा, २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी होणार नाही असे सोमवार,दि. ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे.
सरन्यायाधीश खन्ना हे येणाऱ्या १३ मे रोजी पद सोडणार आहेत आणि अंतरिम आदेश देण्यासाठीही या प्रकरणाची दीर्घ सुनावणी आवश्यक असल्याने न्या.बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून सुनावणी होईल असे न्या. खन्ना म्हणाले.
याचिकाकर्त्यांकडून वक्फ नोंदणीबाबत काही मुद्दे उपस्थित केले गेले आहेत आणि वादग्रस्त काही आकडेवारी मांडली आहे. त्यावर विचार करणे आवश्यक आहे. अंतरिम टप्प्यातही मला कोणताही निर्णय किंवा आदेश राखून ठेवायचा नाही.
या प्रकरणाची सुनावणी माझ्यासमोर येणार नाही. न्या. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होईल,आणि खंडपीठात न्या. पी.व्ही संजय कुमार आणि न्या. के.व्ही विश्वनाथन असतील असे सरन्यायाधीश खन्ना म्हणाले.