चितगाव न्यायालयाचा आदेश, चिन्मय कृष्ण दास पुन्हा अटकेत

06 May 2025 12:35:53

bangladesh chinmoy krishna das arrested murder of chittagong court lawyer
 
ढाका : (Chinmoy Krishna Das Arrested) बांगलादेशमधील चितगाव न्यायालयाने इस्कॉन प्रभु चिन्मय कृष्ण दास यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. सहाय्यक सरकारी वकील सैफुल इस्लाम उर्फ अलिफ यांच्या हत्येप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आवाराबाहेर अलिफ यांची हत्या करण्यात आली होती.
 
या प्रकरणात आतापर्यंत ५१ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील २१ जण सध्या तुरुंगात आहेत. चितगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांच्या अर्जावर आभासी सुनावणीदरम्यान अटकेचे आदेश दिले. वकिल संघटनेचे अध्यक्ष नाझिम उद्दीन चौधरी यांनी आरोप केला होता की, निदर्शकांनी अलिफ यांना त्यांच्या चेंबरमधून बाहेर ओढून नेले आणि त्यांची हत्या केली. या गंभीर प्रकरणात चिन्मय कृष्ण दास, रिपन दास, राजीव भट्टाचार्य यांच्यासह अनेकांना मुख्य आरोपी ठरवले आहे.
 
दरम्यान, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपात चिन्मय कृष्ण दास यांना ढाका उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, मात्र बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने ३० एप्रिल रोजी या निर्णयाला स्थगिती दिली. चिन्मय दास गेल्या पाच महिन्यांपासून खोट्या देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. त्यांचे वकील अपूर्व कुमार भट्टाचार्य यांनी २३ एप्रिल रोजी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना २५ नोव्हेंबर रोजी ढाक्याच्या हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली होती. या प्रकरणाशी संबंधित इतर तीन अर्जांवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0