जम्मू (Pehelgam attack): पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ जणांचा मृत्यू झाला. याचा प्रत्युत्तर म्हणून भारताने सिंधू जलकरार मोडीत काढल्याचे म्हटले होते. त्या दृष्टीने आता जम्मू काश्मीरमधील बगलीहार आणि सलाल धरणांची दारे बंद केली आहेत. यामुळे चीनाब नदीचा प्रवाह कमी झाला आहे. जम्मूतील अखनूर भागातून नदीपात्र स्थानिक पायीच पार करत आहेत. १९६०मध्ये झालेला भारत-पाक सिंधू जल करार स्थगित झाला आहे. या करारानुसार, भारताने चिनाब नदीच्या पाण्याचा प्रवाह स्थगित करण्यापूर्वी पाकिस्तानला सांगणे आवश्यक होते. मात्र, आता करारच रद्दबातल झाला असल्याने भारताने पूर्वसूचना न देता धरणांची दारे बंद केली आहेत.
बगलीहार आणि सलाल ही दोन्ही धरणे 'रन-ऑफ-द-रिव्हर' प्रकाराची आहेत. म्हणजेच मोठ्या प्रमाणात पाणी साठवू शकत नाहीत. तरीही, या धरणांची दारे बंद केल्यामुळे चिनाब नदीचा प्रवाह तात्पुरता थांबवता येतो. हे पाणी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या या कृतीमुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या कृषी आणि जलविद्युत प्रकल्पांवर याचा परिणाम होऊ शकतो. पाकिस्तानने या कृतीला 'युद्धाचे पहिले पाऊल’ असे म्हणून आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच चिनाब नदीचा तळ दिसू लागला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी पाकिस्तानी नागरिक नदीपात्रात जमले होते. भारताच्या हद्दीतून जाणारा चिनाब नदीचा काही भागही यामुळे प्रभावित झाला आहे. जम्मू काश्मीर पोलीसांनी नदी ओलांडून जाण्यापासून स्थानिकांना रोखले आहे. दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर अचानक पाण्याचा प्रवाह वाढू शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही चिनाब नदीचे पात्र कोरडे पाहिले नाही, असे स्थानिक पत्रकार सांगतात.
या नदीवर पूर्वी करन पूल होता, १० सप्टेंबर १९९२ साली आलेल्या पूरात तो पूर्ण वाहून गेला. काश्मीरचे तत्कालीन राजे राजा हरी सिंह यांच्या काळात जर्मन कंपनीने १९३३-३४ च्या काळात हा पूल बांधला होता. त्याला डॉ. करन सिंह यांचे नाव देण्यात आले होते. त्या काळात आलेल्या प्रचंड पूरात इतका जीर्ण पूल वाहून गेला, अशी माहिती स्थानिक पत्रकार मोहन सिंह जामवाल सांगतात. त्या अभूतपूर्व घटनेनंतर हा आजचा दिवस आहे.