उद्या मुंबईत कधी आणि कुठे होणार मॉक ड्रील? कोणता परिसर होणार ब्लॅकआऊट? जाणून घ्या

06 May 2025 19:19:23
 
Mock Drill in Mumbai
 
 
मुंबई : (Mock Drill in Mumbai) भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बुधवार दि. ७ मे रोजी देशभरात अनेक ठिकाणी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. या युद्धसज्जतेचा एक भाग म्हणून उद्या देशव्यापी मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रील घेऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेने त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं, या सगळ्याचा सराव केला जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सायंकाळी ४ वाजता मॉक ड्रील घेण्यात येणार आहे.
 
हे वाचलंत का? - Mock Drill in Maharashtra : महाराष्ट्रात 'या' १६ ठिकाणी होणार मॉक ड्रिल!
 
६० ठिकाणी सायरन वाजणार, तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित होणार
 
केंद्रीय यंत्रणांकडून मिळालेल्या अलर्टनंतर मुंबईत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि धार्मिक स्थळांवर मॉक ड्रील्स करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मॉक ड्रील्समुळे काही भागांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात वीजपुरवठा खंडित केला जाऊ शकतो. तसेच ६० वेगवेगळ्या ठिकाणी सायरन वाजवण्यात येणार आहेत. ही मॉक ड्रिल पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचं प्रशासनाने आधीच स्पष्ट केलं आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावं याची जाणीव नागरिकांना करून देणं हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
 
मुंबईत 'या' भागात होणार ब्लॅकआऊट
 
या मॉक ड्रीलदरम्यान मुंबईत ब्लॅकआऊट देखील केले जाणार आहे. मात्र हे ब्लॅकआऊट संपूर्ण मुंबईत नसेल, तर उपनगराच्या एका छोट्या भागात केले जाणार आहे. यादरम्यान परिसरातील लाईट्स बंद होतील आणि परिसर निर्मनुष्य केला जाईल. तसेच नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येईल. यासंदर्भात नागरी सुरक्षा विभागामार्फत मॉकड्रीलसंदर्भात एक अधिकृत निवेदन जारी केले जाईल आणि त्यात दिलेल्या मार्गदर्शक तत्वे आणि नियमांनुसार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0