Mock Drill India : देशभरात युद्धाचे 'मॉक ड्रील'! ७ 'मे'ला नक्की काय घडणार?

06 May 2025 20:10:10
 
Mock Drill India IndiaVsPakistan Mock Drill Maharashtra Civil Defence
 
Mock Drill India :  पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान युद्धाच्या चर्चा असताना दोन्ही देशांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होत असल्याचंही पहायला मिळतंय. दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर युद्धसज्जतेच्या दृष्टीने केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातल्या २४४ जिल्ह्यांमध्ये बुधवार दि. ७ मे रोजी 'मॉक ड्रील' अर्थात युद्धकाळातील उपायांचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत. . या २४४ जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या १६ ठिकाणांचाही समावेश आहे. या सरावादरम्यान संभाव्य हवाई हल्ल्यांचा इशारा देणाऱ्या सायरनचा सराव तसेच कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यावेळी स्वतःचा बचाव कसा करायचा यासंबंधी सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संदर्भात सरकारने नेमके काय आदेश दिले आहेत? मॉक ड्रिल म्हणजे नेमकं काय? आणि देशात कोणकोणत्या ठिकाणी होणार आहे? ही ठिकाणं निवडण्याचं कारणं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या...
 
गृहमंत्रालयाचे राज्यांना आदेश
 
केंद्रीय गृह मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या म्हणजेच ७ मे रोजी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या जनरल फायर सर्व्हिस, सिव्हिल डिफेन्स (नागरी संरक्षण ) आणि होमगार्ड अँड सिव्हिल डिफेन्स डायरेक्टरेट जनरलने ५ मे रोजी मॉक ड्रिलचे आदेश दिलेत. हे आदेश देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवण्यात आले आहेत. या आदेशात केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील २४४ सूचीबद्ध जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाचा सराव आणि मॉक ड्रिल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरी संरक्षण कायद्यानुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाला असे मॉक ड्रिल आयोजित करण्यासाठी राज्यांना सूचना जारी करण्याचा अधिकार आहे.
 
महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर
 
केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार हायअलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवरील हालचालींना वेग आला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी देशातील कोणकोणत्या ठिकाणी उद्या मॉक ड्रील आणि ब्लॅकआऊट होणार आहे, याची यादी समोर आलीय. यात महाराष्ट्रात एकूण १६ ठिकाणं आहेत. २०१० साली केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या यादीचा संदर्भ आहे.
 
महाराष्ट्रातील 'या' १६ ठिकाणी होणार युद्धाची मॉक ड्रील
 
या यादीत तीन श्रेणींमध्ये ठिकाणांना वर्गीकृत करण्यात आलंय. पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी १३ शहरे आहेत. दुसऱ्या श्रेणीत २०१ आणि तिसऱ्या श्रेणीत ४५ शहरे आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत येत आहेत. मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे. तर उरण येथे माल वाहतूक करणारे महत्त्वाचे जेएनपीटी बंदर आहे. तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तिन्ही ठिकाणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. दुसऱ्या श्रेणीत महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ-वायशेत, पिंपरी-चिंचवडतर तिसऱ्या श्रेणीत औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे.
 
मॅाक ड्रील म्हणजे काय?
 
आता मॅाक ड्रील म्हणजे काय आणि मॉक ड्रीलमध्ये नेमकं काय होणार? हे समजून घेऊयात...मॉक ड्रील म्हणजेच युद्ध सराव हा क्षेपणास्त्र हल्ले, हवाई हल्ले या दरम्यान निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी काय उपाययोजना करायला पाहिजे? सरकारी यंत्रणांनी कसं कार्यरत राहिलं पाहिजे यासंदर्भातील सराव असतो. थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा थेट युद्ध सुरु झाल्यानंतर जर शत्रूने एखादं शहर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं, काय काळजी घेतली पाहिजे, सरकारी यंत्रणांनी काय करायचं? या सगळ्याची तयारी म्हणजे मॉक ड्रील.
 
मॉक ड्रीलमध्ये नेमकं काय होणार?
 
गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नागरिकांचे संरक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य प्रतिसाद देण्यासाठी काही गोष्टींचा सराव केला जाणार आहे, सर्वप्रथम नागरिकांना अलर्ट करण्यासाठी युद्धकालीन सायरन वाजवण्यात येईल. यानंतर नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून, एखाद्या बंकर किंवा सेफ हाऊसकडे नेलं जाऊ शकते. हल्ल्याच्या वेळी ‘ब्लॅकआउट’ करणे (लाईट बंद ठेवणे). महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया. हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, या सगळयाचा समावेश या मॅाक ड्रीलमध्ये असणार आहे. आदेशानुसार, या मॉक ड्रिलमध्ये जिल्हा नियंत्रक, जिल्ह्यातील विविध अधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक, गृहरक्षक दल, एनसीसी, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटना आणि शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे.
हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी ही मॉक ड्रील अत्यंत महत्त्वाची - निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन
 
या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले लष्करी अधिकारी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सर्वसामान्य नागरिकांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. यावेळी ते म्हणाले, " केंद्र सरकारने मॉकड्रीलचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये विमानाचा, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनचा हल्ला होण्याची शक्यता असलेल्या परिसरात ब्लॅकआऊट केले जाते. लष्करी तळ असलेल्या भागात हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी संरक्षण असते. मात्र, नागरी भागात एअर डिफेन्स नसतो. त्यामुळे हल्ला झाल्यास नागरिकांना स्वत:च संरक्षण करावे लागते. त्यादृष्टीने ही मॉक ड्रील अत्यंत महत्त्वाची असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
 
हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट्स बंद केले पाहिजेत. कारण लाईट्स सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचं लक्ष्य सहज नजरेस पडेल. त्यामुळे शहरात पूर्ण काळोख केल्यास शत्रूला लक्ष्य शोधणं कठीण होईल. त्यामुळे अश्यावेळी उजेडाचा कुठलाही स्त्रोत टाळावा. कारण शत्रूसाठी तो संकेत ठरु शकतो. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे. जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय, नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत. जी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करता येत नसतील, त्यांच्यावर लक्ष ठेवावे. याशिवाय, हवाई हल्ल्यात कोणी जखमी झाले तर त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात कसे पोहोचवायचे, याचा सराव मॉक ड्रीलमध्ये केला जाईल. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यास लोकांनी अचानक घाबरुन जाऊ नये, यासाठी मॉकड्रील महत्त्वाची असल्याचे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
 
विनाकारण कोणतेही धाडस करु नका
 
यावेळी ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धातील एक प्रसंग सांगितला. त्यावेळी पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला होता. त्यावेळी अँटी एअरक्राफ्ट गनने गोळीबार सुरु होता. यावेळी अँटी एअरक्राफ्ट गनचे कवच (शेलिंग) खाली पडत होते. ते गोळा करायला झोपडपट्टीतील काही लोक बाहेर पडले होते. आणि या सगळ्या नादात त्यांचा जळून मृत्यू झाला होता. त्यामुळे हवाई हल्ल्याच्यावेळी असे कोणतेही धाडस करु नका, असा सल्ला ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी दिला.
 
राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराची जबाबदारी नाही
 
ही मॉक ड्रील पूर्णतः सरावासाठी असून प्रत्यक्ष धोका नसल्याचे प्रशासनाने आधीच स्पष्ट केले आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करावे याची जाणीव नागरिकांना करून देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत? हे यातून दिसणार आहे. कारण राष्ट्रीय सुरक्षा ही केवळ लष्कराची जबाबदारी नाही. अश्या प्रसंगी जेव्हा सामान्य नागरिकांना काय करावे, केव्हा करावे आणि संयम राखून परिस्थिती कशी हाताळावी हे कळते तेव्हा संपूर्ण राष्ट्राची ताकद वाढते. आणि ही केवळ हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया नसून हल्ल्यापूर्वीच्या जागरूकतेचा एक भाग आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता या मॅाक ड्रील संदर्भातील सरकारी सूचनांचे पालन करणं अपेक्षित आहे.
Powered By Sangraha 9.0