उज्जैनच्या बाबा महाकाल मंदिरात भीषण आग

06 May 2025 12:29:45
 
Mahakal temple in Ujjain
 
भोपाळ : ( Mahakal temple in Ujjain ) मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या गेट क्रमांक 1 वर भीषण आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. 5 मे रोजी दुपारी 12 वाजता महाकालेश्वर मंदिराच्या फॅसिलिटी सेंटरवर असलेल्या प्रदूषण मंडळाच्या नियंत्रण कक्षात अचानक आग लागली. या आगीने प्रचंड स्वरूप घेताच परिसरात धुराचे लोट दिसू लागले. या घटनेची माहिती तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली.
 
या आगीमुळे मंदिर परिसरातदेखील खळबळ उडाली. दरम्यान, दररोज हजारो भाविक बाबा महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनच्या मंदिरात हजेरी लावत असतात. या आगीच्या घटनेनंतर मंदिरात चांगलाच गदारोळ माजला. सुरक्षेचा विचार करता मंदिर प्रशासनाने गेट क्रमांक 1 तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सध्या मंदिराच्या या प्रवेशद्वारातून भाविकांना आत जाता येणार नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, आगीमुळे मंदिराच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0