मुंबई: ( Cabinet meeting today in Punyashloka Ahilyadevi birthplace ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी मंगळवार, दि. 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे या बैठकीसाठी जोरदार तयारी करण्यात आली असून, दीड एकर जागेवर ‘जर्मन हँगर’ प्रकारचा अग्निप्रतिबंधक मंडप उभारण्यात आला आहे.
या कॅबिनेट बैठकी दिवशी चौंडीमध्ये सुमारे 600 व्हीव्हीआयपी आणि दोन हजार विशेष पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी पाच हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. तसेच, विविध ठिकाणी वाहनतळांची निर्मिती करण्यात आली असून, वाहतुककोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रूंद असा ‘जर्मन हँगर’ प्रकारचा वातानुकूलित मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात 3 हजार, 500 खुर्च्यांची व्यवस्था, ग्रीन रूम्स, बैठक कक्ष, मुख्य सचिवांचे कार्यालय, पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष, स्वयंपाकगृह आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.
विशेष भोजन व्यवस्था
महाराष्ट्राच्या इतिहासात ग्रामीण भागात होणारी ही पहिलीच मंत्रिमंडळ बैठक असून, ती ऐतिहासिक ठरावी; यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. अहिल्यानगरमधील स्वादिष्ट अन्नपदार्थांचे मेजवानी यावेळी असेल.
त्यात शिपी आमटी, मासवडी, शेंगोळे, पुलाव, कुरडई, थालीपीठ, खवा पोळी, पुरणपोळी, कोथिंबीर वडी, हुरडा थालीपीठ, वांग्याचे भरीत, डाळ बट्टी, मटकी, मसाला वांगे, स्पेशल शिंगोरी आमटी, भात, बाजरीची भाकरी, दही-धपाटे, आमरस चपाती, भाकरी, अळूवडी, मूगभजी, शेवगा भाजी, ठेचा, भाकरी थाळी, म्हैसूर बौंडा, मांडे आदी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.