राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी

मंत्रिमंडळाचा निर्णय; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन

    06-May-2025   
Total Views |

5 lakh 503 thousand crores approved to develop pilgrimage spots in India

अहिल्यानगर (चौंडी)
:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज्यातील विविध ७ तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंगळवार, दि. ६ मे रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे मंगळवार, दि. ६ मे रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. तीर्थस्थळांच्या विकासासाठी मंजूर केलेल्या निधीपैकी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन आणि संवर्धन ६८१.३२ कोटी, अष्टविनायक गणपती मंदिरांचा जिर्णोद्धार (लेण्याद्री वगळता) १४७.८१ कोटी, श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा १ हजार ८६५ कोटी, श्री क्षेत्र जोतीबा मंदिर विकास आराखडा २५९.५९ कोटी, नाशिकमधील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा २७५ कोटी, कोल्हापूर श्री क्षेत्र महालक्ष्मी विकास आराखडा १ हजार ४४५ कोटी रुपये, नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा ८२९ कोटी रुपये, या आराखड्यांचा समावेश आहे.

अहिल्यादेवींवर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्री परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन जागतिक स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट दूरदर्शन आणि ओटीटी माध्यमावरुनही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

- चित्रपट निर्मितीसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठीची संस्था आणि दिग्दर्शक निवडीसाठी सात एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली. यानुसार या शासन निर्णयांमध्ये तरतूद करण्यात आलेली छाननी आणि निवड समिती दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मिती संस्था निवडक करेल.

- चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांना अनुदान सहाय्यक अनुदाने यामधील अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यासही मान्यता देण्यात आली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.