बारावीच्या परीक्षेत कोकणाचा डंका

- विज्ञान शाखेचा निकाल आशादायक; मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक

    05-May-2025
Total Views | 10

बारावीच्या परीक्षेत कोकणाचा डंका


मुंबई, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेत यंदाही कोकणाचा डंका पहायला मिळाला. अन्य शाखांपेक्षा यंदा विज्ञान शाखेचा निकाल आशादायक असून, मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक आहे.


इयत्ता १२ वीची परीक्षा दि. ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली. या परीक्षेचा निकाल सोमवार. दि. ५ मे रोजी मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केला. या परीक्षेत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य, व व्यवसाय अभ्यासक्रम व आयटीआय या शाखांसाठी एकूण १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ लाख २ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची ही टक्केवारी ९१.८८ आहे. सर्व विभागीय मंडळांमधून कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के इतका सर्वाधिक आहे.


कोकण विभागातील २२ हजार ७९७ (९६.७४ टक्के), कोल्हापूर विभागातील १ लाख ६ हजार ४ (९३.६४ टक्के), मुंबई विभागातील २ लाख ९१ हजार ९५५ (९२.९३ टक्के), छत्रपती संभाजीनगर १ लाख ६५ हजार ९६१ (९२.२४ टक्के), अमरावती १ लाख ३२ हजार ८१४ (९१.४३ टक्के), पुणे २ लाख २१ हजार ६३१ (९१.३२ टक्के), नाशिक १ लाख ४४ हजार १३६ (९१.३१ टक्के), नागपूर १ लाख ३६ हजार ८०५ (९०.५२ टक्के) आणि लातूर विभागातील ८० हजार ७७० (८९.४६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


मुलींची टक्केवारी अधिक


सर्व विभागीय मंडळांतून ६ लाख ७६ हजार ९७२ मुले, तर ६ लाख २५ हजार ९०१ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. नियमित मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख ४९ हजार ९३२ विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, ४ लाख ७ हजार ४३८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५ लाख ८० हजार ९०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर १ लाख ६४ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.


शाखानिहाय उत्तीर्ण विद्यार्थी


विज्ञान – ७ लाख १५ हजार ५९५ (९७.३५ टक्के)
कला – २ लाख ८१ हजार ६०६ (८०.५२ टक्के)
वाणिज्य – २ लाख ७७ हजार ६२९ (९२.६८ टक्के)
व्यवसाय अभ्यासक्रम – २४ हजार ४५० (८३.२६ टक्के)
आयटीआय – ३ हजार ५९३ (८२.०३ टक्के)








अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121