- 4 दिवसांत 800 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची उलाढाल!
05-May-2025
Total Views |
मुंबई: ( Waves Summit 2025 concludes in the world of creativity ) भारताच्या सृजनशक्तीचे सामर्थ्य दर्शवणारा तसेच भारतीय कलासृष्टीला जागतिक मनोरंजन क्षेत्रातील बाजाराशी जोडणारा ‘जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद’ अर्थात ‘वेव्हज समिट-2025’ अखेर संपन्न झाली. दि. 4 मे रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मनोरंजन क्षेत्र यावर परिसंवाद आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना मार्गदर्शक ठरतील, अशा काही सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर भारताची विविधता दर्शवणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
दि. 1 मे ते दि. 4 मे रोजीदरम्यान मुंबईच्या ‘जिओ वर्ल्ड सेंटर’ येथे आयोजित या समिटमध्ये 90 पेक्षा जास्त देशांनी आपला सहभाग नोंदवला. समाजमाध्यमांवर कंटेंट क्रिएशनच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहणार्या अनेक कलाकारांनी या परिषेदला हजेरी लावली. ‘स्टार्टअप इकोसिस्टम’ला बळ देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘वेव्हएक्स’ या उपक्रमांतर्गत 30 स्टार्टअप्सना थेट गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडण्याची संधी मिळाली. उद्योजकता आणि गुंतवणूकदार यांचा एक अनोखा संगम यावेळी अनुभवायला मिळाला.
या परिषदेअंतर्गत ‘जागतिक माध्यम संवाद’ या विचारपीठाचीसुद्धा मुहूर्तमेढ रोवण्यात आली, ज्याअंतर्गत सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा आणि समाजातील डिजिटल गॅप कमी करण्याचा विचारसुद्धा मांडण्यात आला. या संवाद परिषदेत एकूण 77 देश थेट सहभागी झाले होते. भारताचे सांस्कृतिक संचित दर्शवणार्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या परिषदेत करण्यात आले होते. मनोरंजन क्षेत्रापासून ते सृजनात्मक कलाकृतींच्या भविष्याचा वेध घेणारे चर्चासत्र, परिसंवाद यावेळी संपन्न झाले. जगभरातून सहभागी झालेल्या प्रेक्षकांना एक अनोख्या विचारमंथनात सहभागी होण्याची संधी मिळाली.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वव्यापी वापर लक्षात घेता, ‘वेव्हज समिट-2025’ मध्ये ‘एआय’च्या अनुषंगाने व्यापक चर्चा बघायला मिळाली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे, कलाक्षेत्र यांच्यावर होणारे परिणाम भविष्यातील संधी यावर विचारविमर्श करण्यात आला. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मनोरंजन क्षेत्रात निर्माण होणार्या नवीन संधींची ओळख या परिषदेत करून देण्यात आली. भारतीय सिनेमाचे विस्तारणारे क्षितिज इथपासून ते शास्त्रीय संगीताचा वारसा या विषयांवर अनेकांनी आपली मते मांडली. ई-स्पोर्ट्स आणि गेमिंगच्या क्षेत्रात निर्माण होणार्या नवीन संधी, तसेच गेमिंग या क्षेत्राकडे व्यवसायाच्या व्यापक दृष्टिकोनातून बघणे, याचासुद्धा विचार करण्यात आला. तंत्रज्ञानात वेगाने होणार्या बदलांमुळे सिनेसृष्टीमध्येसुद्धा वेगवेगळे प्रयोग आपल्याला बघायला मिळतात. अशाच वेगवेगळ्या तांत्रिक प्रयोगांची ओळख या परिषदेत करून देण्यात आली.