बिस्किटचित्रे!

    05-May-2025
Total Views |
 
Using biscuits a London artist has created some such sculptures The artist
 
गरमागरम चहा आणि बिस्किटे या दोन पदार्थांनी, अनेकांच्या सकाळची सुरुवात होते. लहान मुलांपासून ते झटपट नाश्ता करून कामावर पळणार्‍या मोठ्या माणसांपर्यंत, चहा-बिस्किट ही जोडी लोकप्रिय आहे. आपल्या रोजच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेली ही बिस्किटे, आता एका वेगळ्याच कारणासाठी लोकप्रिय ठरली आहेत.
 
समजा तुम्हाला कुणी सांगितले की, चहात बुडवून आपण जी बिस्किटे खातो, त्यातूनसुद्धा कलात्मक निर्मिती करता येते तर? विश्वास बसणार नाही, पण बिस्किटांचा वापर करून, लंडनच्या एका चित्रकाराने अशीच काही चित्रशिल्पे तयार केली आहेत. या चित्रकाराचे नाव आहे एड चॅपमन. हा तोच कलाकार आहे, ज्याने नाण्यांच्या माध्यमातून लॉरेल एन हार्डी, ज्येष्ठ अभिनेता मायकेल केन यांच्या चित्रशिल्पाची निर्मिती केली होती. त्याच्या या अनोख्या प्रयोगाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, त्याच्या कामाचे सर्वदूर कौतुक केले जात आहे.
 
लंडनच्या ‘मॅक्विटिस’ या बिस्किट कंपनीला 100 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने एड चॅपमन या कलाकाराने, एक हजारांपेक्षा अधिक बिस्किटांचा वापर करत, इंग्लंडमधल्या सुप्रसिद्ध लोकांची चित्रशिल्प बनवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रख्यात अभिनेत्री जुडी डेंच, प्रसिद्ध गायक डेव्हिड बॉवी, आणि ज्येष्ठ पत्रकार ट्रॅव्हल मॅकडोनाल्ड या मान्यवरांचा समावेश आहे. ही तीच माणसे आहेत, ज्यांना इंग्लंडमध्ये ‘पब्लिक आयकॉन’ म्हणून ओळखले जाते. एड चॅपमन यांनी नेमके याच तीन नावांची निवड करण्यामागची गोष्ट म्हणजे, ‘मॅक्विटिस’ या कंपनीने काही काळापूर्वी केलेले एक सर्वेक्षण आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत मागच्या 100 वर्षांत ब्रिटनच्या संस्कृतीला घडवणारी लोकं नेमकी कोण होती, अशी विचारणा करण्यात आली.
 
यावेळी राणी एलिझाबेथपासून ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक डेव्हिड अट्टेनबॉर्ग अशा अनेक नावांचा यामध्ये समावेश होता. यातीलच तीन नावे निवडून, एड चॅपमन यांनी आपली अनोखी कला सादर केली आहे. चॅपमन म्हणतो की, त्याला हे चित्रशिल्प साकारण्यासाठी एक आठवडापेक्षा जास्त कालावधी लागला. सुरुवातीला हे शक्य होईल का, असा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. परंतु, कालांतराने जेव्हा बिस्किटांमधली विविधता त्याला लक्षात आली, त्यावेळेला ही कल्पना सत्यात उतरवण्याचा निर्धार त्याने केला.
‘मॅक्विटिस’ बिस्किटांचा आकार जरी एक सारखा गोल असला, तरी बिस्किटांच्या रंगसंगतीमध्ये फरक आहे. ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटे खायला मिळाली, म्हणून वेगवेगळ्या फ्लेवर्सची बिस्किटे बाजारात उपलब्ध आहेत. त्या बिस्किटांच्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा असतात. त्यांचाच वापर करून, ही चित्रशिल्पे तयार करण्यात आलेली आहेत. बिस्किट थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत चॅपमन यांनी आपले देखावे सादर केले आहेत. एकदा का जास्त काळ ही बिस्किटे बाहेर राहिली की, त्यांचे मूळ स्वरूप बदलते आणि ती मऊ होतात. यामुळे त्यांना सांधण्याची जी प्रक्रिया आहे, तिच्यात अडथळे निर्माण होतात. या सगळ्या गोष्टींना समजून घेत, बिस्किटांचे चित्रशिल्प उभे ठाकले आहेत. हे चित्रशिल्प तयार झाल्यानंतर, एड चॅपमन यांच्यावर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
 
समाजमाध्यमांवरसुद्धा त्याच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. ब्रिटनच्या संस्कृतीला समृद्ध करणार्‍या स्त्रिया आणि पुरुषांना दिलेली ही आगळीवेगळी मानवंदना, बहुतेक सगळ्यांनाच आवडली. कलाकाराला सीमांचे बंधन नसते असे म्हणतात. त्याच्या कल्पना मुक्तपणे विहार करत, नवनिर्मिती करत असतात. ही नवनिर्मितीची प्रक्रियाच क्रमाक्रमाने समाजाला आशयसंपन्न बनवत असते. एका काळानंतर या आशयाचे रूपांतर सांस्कृतिक वारशामध्ये होते आणि हाच वारसा, आपली ओळख बनते. जगाच्या पाठीवर चित्रकलेत वेगवेगळ्या प्रकारची शैली हाताळत, चित्रकारांनी वेगळा विचार लोकांसमोर ठेवला. चित्राची चौकट ज्यावेळेस कलाकारांना बंधनात टाकू लागली, तेव्हासुद्धा ही चौकट मोडून नवीन विचार वेळोवेळी मांडण्यात आले. एड चॅपमन यांनी बिस्किटांच्या माध्यमातून घडवलेले चित्रशिल्प याचेच द्योतक आहे, यात शंका नाही. ही चित्रशिल्पे कलेचा एक वेगळा आविष्कार लोकांसमोर मांडतातच पण, त्याचबरोबर जगाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टीही यामुळे तयार होते, हेही तितकेच खरे.