देशभर सायरन वाजणार! हवाई हल्ल्यासंदर्भात मॉकड्रील घेण्यासाठी गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना
- रायसिना हिलवर उच्चस्तरीय बैठकांचे सत्र
- पंतप्रधानांची एनएसए, संरक्षण आणि गृहसचिवांशी चर्चा
- नागरी संरक्षणासाठी राज्यांना सज्ज राहण्याचे निर्देश, बुधवारी मॉक ड्रिल
05-May-2025
Total Views |
नवी दिल्ली, पहलगाम हल्ल्याचे गुन्हेगार आणि त्यांच्या समर्थकांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. त्यासाठी रशिया भारताच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे, अशी ग्वाही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी दिली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चौफेर कोंडी करण्यास प्रारंभ केला आहे. भारताच्या भूमिकेस जगभरातून पाठिंबा मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
यावेळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी भारतातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी निष्पाप जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा दर्शविला. या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्यांच्या समर्थकांना शिक्षा झालीच पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्याचप्रमाणे दोन्ही नेत्यांनी भारत-रशिया विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे.
दरम्यान, पंतप्रधानांनी विजय दिनाच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना शुभेच्छा दिल्या आणि वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वार्षिक शिखर परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केले आहे.
राज्यांना ‘मॉक ड्रिल’ घेण्याचे निर्देश
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने ७ मे रोजी प्रभावी नागरी संरक्षणासाठीच्या बाबींसाठी भारतातील अनेक राज्यांना मॉक ड्रिल आयोजित करण्यास सांगितले आहे. त्यामध्ये खालील बाबींचा समावेश असेल –
१. हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनची तपासणी.
२. शत्रूच्या हल्ल्यात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर नागरिक, विद्यार्थी इत्यादींना प्रशिक्षण देणे.
३. क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद.
४. महत्वाची संयंत्रे/प्रतिष्ठानांच्या तत्काळ संरक्षणाची तरतूद.
५. निर्वासन योजनेचे अद्यतन आणि त्याची तपासणी.
पंतप्रधांनी घेतला परिस्थितीचा आढावा
नवी दिल्लीतील रायसिना हिलवरील साऊथ ब्लॉकमध्ये असलेल्या पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) सोमवारी वेगवान घडामोडी घडल्या. पीएमओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्यासोबत बैठकीत आढावा घेतला. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना संरक्षणविषयक घडामोडींची आणि तयारीची माहिती दिली. त्याचप्रमाणे देशाचे गृहसचिव गोविंद मोहन यांनी पीएमओमध्ये पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना तयारीचा आढावा दिला.
जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय चर्चा
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षण मंत्री जनरल नाकातानी यांची सोमवारी रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ केंद्रामध्ये द्विपक्षीय बैठक झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दहशतवाद आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत कारवायांविरोधात एकजुटीने भूमिका घेण्याचे आवाहन केले. जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला आणि याबाबत जपानचा भारताला पूर्ण पाठींबा असल्याचे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानची आर्थिक मदत थांबवा – एशियन बँकेस भारताचे आवाहन.
पहलगाम हल्ल्यानंतर पाकची आर्थिक कोंडीही करण्यास भारताने प्रारंभ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकचे अर्थसहाय्य रोखण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी ईटलीसही पाकचे अर्थसहाय्य रोखण्याचे आवाहन केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.