कुख्यात नक्षलवादी प्रशांत कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ अटकेत! पुणे दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

    05-May-2025   
Total Views |
 
Naxalite Prashant Kamble alias
 
पुणे : (Naxalite Prashant Kamble arrested) ठाणे येथे दाखल गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी कुख्यात नक्षलवादी प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ यास अखेर दहशतवादी विरोधी पथकाच्या पुणे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल असून, तो २०११ पासून फरार होता.
 
दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे शाखेने दि. ३ मे रोजी सापळा रचून प्रशांत कांबळे याला पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्होली येथून ताब्यात घेतले. त्याची पडताळणी केल्यानंतर ४ मे रोजी त्याला अधिकृतपणे अटक करण्यात आली. त्यास ५ मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यास १३ मे २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
 
प्रशांत कांबळे हा गेल्या ६ ते ७ वर्षांपासून रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरात स्वतःचे अस्तित्व लपवून वास्तव्य करत होता. तो रायगड जिल्हयातील आदिवासी पाडयातील मुलांना शिकवत होता. मुंबई सत्र न्यायालयाने त्यास फरार घोषित केले होते, तसेच त्याच्याविरोधात अटक वॉरंट आणि जाहीरनामा काढण्यात आला होता.
 
प्रशांत कांबळे याच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३८७, ४१९, ४६५, ४६७, ४६८, १२०(ब) तसेच बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम १९६७ चे कलम १०, १३, १७, १८, १८अ, १८ब, २०, २१, ३८, ३९ व ४० (२) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या दहशतवाद विरोधी पथक करीत आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\