Maharashtra HSC Result 2025 : यंदा बारावीच्या निकालात मुलींची बाजी! राज्याचा निकाल ९१.८८ टक्के

05 May 2025 13:05:26
 
Maharashtra HSC Result 2025 Updates
 
 
मुंबई : (Maharashtra HSC Result 2025 Updates) महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बारावीच्या परिक्षेत कोकणचा निकाल ९६.७४ टक्के सर्वाधिक लागला आहे. तर लातूर ८९.४६ टक्के निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्य मंडळाकडून सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन निकालाबाबतची माहिती देण्यात येणार आली आहे. आज दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. 
 
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय. टी. आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची महाराष्ट्राची टक्केवारी ९१.८८ आहे.
 
यंदा बारावीच्या निकालात मुलींची बाजी
 
निकालात ६, २५,९०१ मुली, तर ६,७६,९७२ मुले उत्तीर्ण झाली आहेत. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी राज्य मंडळाच्या पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला आहे. मंडळाचे सचिव देविदास कुलाळ या वेळी उपस्थित होते.
 
नोंदणी केलेल्या १४, २७, ०८५ नियमित विद्यार्थ्यांपैकी १४,१७,९६९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील १,४९, ९३२ विद्यार्थ्यांन ७५ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखेचा ९७.३५ टक्के, कला शाखेचा ८०.५२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९२.६८ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा ८३.२६ टक्के, आयटीआयचा निकाल ८२.०३ टक्के लागला.
 
विभागनिहाय निकाल २०२५ :
  • कोकण - ९६.७४ %
  • कोल्हापूर - ९३.६४ %
  • मुंबई - ९२.९३ %
  • संभाजीनगर - ९२.२४ %
  • अमरावती - ९१.४३ %
  • पुणे -९१.३२ %
  • नाशिक -९१.३१ %
  • नागपूर - ९०.५२ %
  • लातूर - ८९.४६ %
 
Powered By Sangraha 9.0