मुंबई: (BKC underground bullet train station) “मुंबईतील ‘बीकेसी’ बुलेट ट्रेन स्थानकाचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. भूमिगत स्थानकांपैकी तिसर्या मजल्याचे काम सुरू आहे. या भूमिगत स्थानकांना आधार आणि मजबुती देणारे काम पूर्ण झाले आहे. आता स्थानकांच्या भिंती उभारण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच भुयारी मार्गाचे कामही वेगात सुरू आहे.
हे स्थानक मल्टी स्टोरेज इमारत स्वरूपात असेल. स्थानक बी-1, बी-2 आणि बी-3 स्वरूपात आहे. बी-3 मध्ये गाड्या असतील. बी-1 आणि तळमजल्यावर प्रवासी स्थानकात प्रवेश करतील,” अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील निर्माणाधीन मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाला भेट दिली आणि स्थानकाच्या प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक असलेले मुंबई बुलेट ट्रेन स्थानक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. हे स्थानक जमिनीपासून सुमारे 26 मीटर खोलीवर असून प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे एकूण तीन मजले असतील. या कामासाठी सुमारे 32 मीटर (अंदाजे 100 फूट) खोलपर्यंत उत्खनन केले जात आहे. या स्थानकात एकूण सहा प्लॅटफॉर्म असतील आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मची लांबी सुमारे 415 मीटर असेल.
मेट्रो आणि रस्तेमार्गांशी जोडणी
- या स्थानकासाठी दोन प्रवेश/निर्गम बिंदू नियोजित आहेत. एक ’मेट्रो लाईन 2बी’च्या जवळच्या मेट्रो स्थानकाला सहज प्रवेश मिळावा, यासाठी आणि दुसरा ‘एमटीएनएल’ इमारतीकडे जाण्यासाठी आहे.
- या स्थानकाची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्म स्तरावर प्रवाशांच्या हालचालीसाठी आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध असेल. पुरेशा नैसर्गिक प्रकाशासाठी एक समर्पित स्कायलाईटची व्यवस्था केली गेली आहे.
कामाची प्रगती
सुमारे 76 टक्के उत्खनन कार्य (अंदाजे 14.2 लाख घनमीटर) पूर्ण झाले आहे. या साइटवर एकूण 1,872,263 घनमीटर भूमीचे उत्खनन करणे आवश्यक आहे. साईटवर 120 क्यूबिक मीटर/तास क्षमतेची तीन बॅचिंग प्लांट्स कार्यरत आहेत. बॅचिंग प्लांटमध्ये बर्फाचे प्लांट आणि चिलर प्लांट असते, जे काँक्रीटचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते.
साईटवर एक आधुनिक काँक्रीट लॅब उपलब्ध आहे. बांधकाम बेस स्लॅबसाठी ‘एम-60 काँक्रीट’ आणि कॉलमसाठी ‘एम-80 काँक्रीट’ वापरून केले जाईल. बुलेट ट्रेन स्थानकासाठी बेस स्लॅब सर्वात खोल बांधकाम पातळी तयार करेल. केवळ बेस स्लॅब कास्टिंगसाठी सुमारे दोन लाख घनमीटर काँक्रीट ओतले जाईल. आतापर्यंत 27 हजार घनमीटर काँक्रीट ओतण्यात आले आहे. साईटसाठी 100 टक्के सेकंट पायलिंग (3384 नग), कॅपिंग बीम (2203 आरएमटी) आणि फ्लड वॉल (2078 आरएमटी)चे काम आधीच पूर्ण झाले आहे.