समरस समाजासाठी कायदा!

05 May 2025 22:18:16
समरस समाजासाठी कायदा!
‘अभाविप’ची कार्यकर्ता ते कायद्याविषयीच्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता असा नावलौकिक असलेल्या, अ‍ॅड. सुनिता खंडाळे-साळसिंगीकर यांच्याविषयी...


घरगुती भांडण झाले. भांडण बघायला शेजारीपाजारी जमले. मात्र, त्या भांडणामुळे त्या महिलेेने स्वतःवर रॉकेल ओतून घेतले. ती स्वतःला पेटवणार, इतक्यात एका किशोरवयीन मुलीने तिला थांबवले. तिचा जीव वाचवला. त्या शाळेकरी मुलीची हिंमत, प्रसंगावधान आणि दुसर्‍याला मदत करण्याची तळमळ आजही कायम आहे. ती मुलगी म्हणजेच अ‍ॅड. सुनिता खंडाळे-साळसिंगीकर. त्या ‘दर्द से हमदर्द तक’ या कायदेशीर मदतीच्या क्षेत्रात काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेच्या विश्वस्त आहेत. ‘लीगल एड ऑन व्हिल’ या उपक्रमाच्याद्वारे त्या तळागाळातील आणि खर्‍या अर्थाने शोषित-वंचित असलेल्या व्यक्तींपर्यंत कायद्याची मदत पोहोचावी, यासाठी काम करतात. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या विविध पदांची जबाबदारी लीलया पार पाडलेल्या अ‍ॅड. सुनिता यांच्या जीवनाचा मागोवा घेऊ या.
खंडाळे कुटुंब हे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गाढे जळगाव या गावचे. सुनिता यांचे वडील सुदाम हे वायरिंग कंपनीमध्ये कामाला होते, तर सुमनबाई या गृहिणी होत्या. या उभयंतांना चार मुली आणि दोन मुले, त्यापैकी एक सुनिता. सुनिता यांचे घरचे वातावरण धार्मिक आणि अत्यंत सुसंस्कृत. घरी लक्ष्मीपूजन आणि सगळेच हिंदू सण अत्यंत धार्मिक आणि पद्धतशीरपणे साजरे व्हायचे. त्यांच्या आत्याचे पती हे भंतेजी होते (बौद्ध उपासक ज्यांनी ‘चिवर’ धारण केले ते). त्यामुळे घरी बुद्धवंदनाही केली जायची. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्धांच्या विचारांना प्रमाण मानणारे असे हे खंडाळे कुटुंब होते. हेच संस्कार सुनिता यांच्यावरही झाले.
सुनिता यांनी लहानपणीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरचा धडा वाचला. जातीय विषमतेमधून बाबासाहेबांना भोगावा लागलेला त्रास, त्याचवेळी आंबेडकर नावाच्या शिक्षकांचा आणि गाडगीळ गुरुजींचा बाबासाहेबांविषयीचा स्नेह, सयाजीराव महाराज आणि शाहू महाराज यांनी बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचा व कर्तृत्वाचा केलेला उचित गौरव हे सगळे त्यांनी या धड्यामध्ये वाचले. हे वाचून सुनिता यांच्या मनावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महानता कोरली गेली. तसेच, जातीय विषमता जरी असली तरी जगात चांगली माणसेही आहेत, जे जातीपाती पलीकडे आणि सगळ्या भेदांपलीकडे जाऊन माणूस म्हणून जगतात आणि वागतात. हा विचार सुनिता यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनला.
असो. सुनिता या दहावीला असताना “कशाला शिकवतोस पोरीला उरकून टाक पोरीचे लग्न,” असे म्हणत,नातेवाईकांनी सुदाम खंडाळे यांना नको नकोसे केले. पण, सुमनबाई या निर्धाराने म्हणाल्या, “माझ्या दोन मोठ्या मुलींचे लग्न लहान वयात केले. पण, माझ्या या दोन लहान मुलींना मी शिकवणार.” त्यामुळेच सुनिता या ‘एलएलबी’पर्यंतचे उच्चशिक्षण पूर्ण करू शकल्या. शिकत असतानाच ‘प्रतिभा संगम’ कार्यक्रमामुळे त्यांची ओळख, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’शी झाली. डॉ.सुहास वायकोस, अ‍ॅड. संतोष पंदरगे, परमेश्वर हसबे, उत्तम पाटील, प्रा. चंद्रशेखर देशपांडे या सगळ्यांशी त्यांचा संपर्क झाला. ‘अभाविप’चे विद्यार्थ्यांसाठीचे काम पाहून, मूळचा सामाजिक कार्यकर्त्याचा आत्मा असलेल्या सुनिता यांना अधिकच प्रेरणा मिळाली. त्या ‘अभाविप’च्या कार्यकर्त्या झाल्या. मात्र, नातेवाईकांनी आणि वस्तीतील लोकांनी विरोध केला. त्यांचे मत होते, “आपण मागासवर्गीय आहोत, त्यामुळे या संघटनेत सुनिताने काम करू नये.” पण, ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ ही संघटना देश, समाजासाठी निर्भय आणि निस्वार्थीपणे काम करते, हे खंडाळे कुटुंबीयांनी अनुभवले होते. त्यामुळे त्यांनी सुनिता यांना अडवले नाही. पुढे त्या शिकता शिकता ‘गुरूवर्य लहुजी वस्ताद केंद्रा’त,समन्वयक म्हणून काम करू लागल्या. केंद्राचे दिवाकर कुलकर्णी आणि डॉ. प्रसन्न पाटील यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य त्यांना लाभले. त्यामुळे विचारांच्या कक्षा आणखीनच रूंदावल्या. ‘एलएलबी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या कामानिमित्त मुंबईला आल्या. परिषदेतील इतर समविचारी लोकांच्या सहकार्याने त्या मुंबईत, ‘वकील’ म्हणून काम करू लागल्या.
सुनिता यांनी उच्चशिक्षण घेणे आणि मुंबईत येऊन काम करणे, हे वाटते तितके सोपे नव्हते. कारण सुनिता ज्या परिसरात राहत होत्या, तिथे मुलींनी शिकणे आणि शहरात नोकरी करणे, हे अगदी 2000 सालच्या दशकातही तितकेसे प्रचलित नव्हते. पण, खंडाळे कुटुंब सुनिता यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. पुढे त्यांचा अ‍ॅड. प्रकाश साळसिंगीकर यांच्याशी विवाह झाला. दोघेही एकत्र काम करू लागले. त्यावेळी दोघांना जाणवले की, अनेकदा अल्पवयीन मुले-मुली नाहक गुन्हेगारीमध्ये गोवले जातात आणि त्यांना शिक्षाही भोगावी लागते. काहीजणांना यातून सोडवणारे कुणीही नसते. तसेच अनेक गुन्हेगारांचे धर्मांतरण करण्याचा धंदाही काही लोक करतात. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’तून घडलेले अ‍ॅड. प्रकाश आणि अ‍ॅड. सुनिता यांनी शिक्षणाचा उपयोग अशा शोषित, वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठीचे व्रत घेतले. या व्रताचे कार्य अहोरात्र सुरू आहे. अ‍ॅड. सुनिता म्हणतात, “डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि ‘अभाविप’च्या कार्यातला अनुभव नेहमी माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. कायदा जनमाणसांपर्यंत पोहोचावा, कायद्याच्या मदतीशिवाय कुणीही वंचित राहू नये, समतापूर्ण समरस समाजासाठी कायद्याचा उपयोग व्हावा, यासाठी मी आयुष्यभर काम करणार आहे.” अ‍ॅड. सुनितासारख्या व्यक्ती या समाजासाठी खर्‍या अर्थाने दीपस्तंभ आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. मुंबई तरुण भारत’ तर्फे शुभेच्छा!

योगिता साळवी
9594969638
Powered By Sangraha 9.0