मुंबई : जागतिक स्तरावरील सर्जनशील आशयनिर्माते, मनोरंजन विश्वातील नामांकित उद्योग कंपन्या, व्हीएफएक्सपासून गेमिंगपर्यंत विविध क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान हे सगळे एका छताखाली आणणारी मुंबईतील वेव्हज शिखर परिषद यशस्वीपणे संपन्न झाली. १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या निमित्ताने मुंबई भेटीवर असलेल्या विविध देशातील शिष्टमंडळाचे गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत पारंपरिक पध्दतीने स्वागत करण्यात आले. चित्रनगरीत सुरू असलेले चित्रीकरण, विविध सेट्स यांना भेट देत त्यांनी चित्रिकरणाविषयी सविस्तर माहिती घेतली.
वेव्हज शिखर परिषदेकरिता आलेल्या जमैका, नेदरलँड, फिजी, स्वीडन, पोर्तुगल आणि युकेमधील शिष्टमंडळाच्या सदस्यांनी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. यावेळी त्यांचे पारंपरिक मराठमोळ्या पध्दतीने स्वागत करण्यात आले. तुतारीचा ललकार आणि ढोलताशे यांच्या गजरात चित्रनगरीत दाखल झालेल्या या सदस्यांचे सुवासिनींनी औक्षण केले. त्यानंतर त्यांना चित्रनगरीची सफर घडवण्यात आली.
_202505041819399105_H@@IGHT_350_W@@IDTH_696.jpg)
भारतीय मनोरंजनाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत पहिला भारतीय बोलपट प्रदर्शित झाला. तिथपासून ते आजवरची चित्रपट, मालिका ते वेबमालिका इथपर्यंतची वाटचाल आणि त्यांचे चित्रीकरण कशापध्दतीने चालते, याची इत्थंभूत माहिती या सदस्यांनी घेतली. यावेळी त्यांना कर्जत येथील एनडी स्टुडिओची माहितीही दृश्यफितीद्वारे दाखवण्यात आली. याशिवाय, चित्रनगरीतील बॉलिवूड पार्क येथे या सदस्यांनी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याचा आनंद घेतला. चित्रनगरीला भेट देत भारतीय चित्रपटसृष्टीची वाटचाल आणि कार्यपध्दती समजून घेता आली, याबद्दल या सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, वित्तीय सल्लागार तथा मुख्यलेखा वित्त अधिकारी चित्रलेखा खातू रावराणे, उप अभियंता ( स्थापत्य ) विजय बापट, व्यवस्थापक कलागरे संतोष खामकर यांच्यासह विविध कर्मचारी उपस्थित होते.