बीड : दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबं उध्वस्त झाली आहेत, अशीच आणखी एक दु:खद घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात घडली. खानापूर या गावात दारुच्या नशेत वडिलांनी आपल्याच मुलाचा जीव घेतल्याची ही घटना.
मृत व्यक्तीचे नाव रोहित गोपाळ कांबळे असून, तो २८ वर्षाचा होता. त्याचा बाप गोपाळ कांबळे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित व गोपाळ या दोघांनाही दारुचे व्यसन होते. गुरुवारी रात्री दोघांनी एकत्र दारु प्यायली. नंतर बाहेर जाउन दारु कोण आणणार, या वरून दोघांमध्ये वाद झाला.
या वादाचे रूपांतर इतक्या टोकाच्या भांडणात झाले की, गोपाळ कांबळेने लाकडी दांडक्याने रोहितच्या डोक्यात जोरात घाव घातला. या घावामुळे रोहित गंभीर जखमी झाला. नातेवाइकांनी त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल केलं, पण उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलीसांचा तपास सुरू असून, गोपाळ कांबळेला अटक केली आहे. दारुचे व्यसन फक्त शरीराला नाही, तर घरच्यांसाठी देखील किती घातक ठरू शकते, याचे हे उदाहरण आहे.