शिवयोगिनीचा पुनर्शोध

31 May 2025 11:27:20
 
reviewing life of Ahilyadevi Holkar
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे भारतीय इतिहासातील सुवर्णपर्व. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य भारतीयांना अनुभवायला मिळाले. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री ते देवत्वापर्यंतचा प्रवास’ या विशेष ग्रंथाचीही निर्मिती झाली. या ग्रंथाचे संपादन इतिहास अभ्यासक, ‘महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती’चे सदस्य प्रणव पाटील यांनी केले आहे. त्यानिमित्ताने या लेखनप्रपंचाचा आढावा घेणारी मुलाखत 
1. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विशेष ग्रंथ संपादित करण्याचा अनुभव कसा होता?
 
- 2025 हे वर्ष अहिल्यादेवींच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष म्हणून देशभर साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी पुण्यात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र’ या संस्थेची स्थापना झाली. त्या कार्यक्रमाला एक श्रोता म्हणून मी हजर होतो. याच कार्यक्रमादरम्यान अहिल्यादेवींवर एक गौरव ग्रंथ प्रसिद्ध करावा, अशी कल्पना पुढे आली. त्यावेळी या कामाची जबाबदारी मी घेतो, असे सहज म्हणून गेलो. त्यानंतर प्रत्यक्षात हे काम किती जबाबदारीचे आहे, याची जाणीव झाली. या ग्रंथात अहिल्यादेवींच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश पडावा, यासाठी विषय निश्चित करण्यात आले. अनेक ठिकाणच्या संशोधकांच्या भेटी घेतल्या. संदर्भ साधनांची यादी करून, ती मिळवली. या प्रवासात ज्या अनेक इतिहास अभ्यासकांना भेटलो, त्यांनाही अहिल्यादेवींच्या कार्याची फारच जुजबी माहिती होती, असे आढळून आले. आपल्याकडे इतिहासात कर्तृत्व गाजवलेल्या स्त्रियांची चरित्रे, म्हणावी त्या प्रमाणात संशोधन करून लिहिलेली नाहीत. शिवाय, या विषयाशी संबंधित कादंबरी या वाङ्मय प्रकारात विपूल लेखन आढळते. परंतु, त्यातही ऐतिहासिक तथ्यांची माहिती न घेता केवळ भावनिक अंगानेच केलेले लेखन फार आहे. त्यामुळे आपल्याकडे फार कमी अभ्यासकांनी खरोखरच अहिल्यादेवींच्या चरित्राचा अभ्यास केला असल्याचे लक्षात आले. म्हणूनच याचे संपादन करण्याआधी संदर्भ साहित्याचे फक्त वाचन न करता, मूळ संदर्भांचा धांडोळा घेऊन त्यांचा तटस्थ राहून अभ्यास सुरू केला. या अभ्यासाचा प्रस्तुत ग्रंथाच्या संपादनासाठी जसा उपयोग झाला, तसाच तो भारताचा पूर्व आधुनिक काळ समजून घेण्याकामीही झाला.
 
2. सदर ग्रंथामध्ये वाचकांना कुठल्या नवीन गोष्टी वाचायला मिळणार आहेत?
 
- या ग्रंथात अहिल्यादेवींचाा चरित्रकालानुक्रम बघून लेखांची निवड झाली आहे. त्यामुळे एकाच प्रकारची किंवा आशयाची माहिती देणारे दोन लेख या ग्रंथात नाहीत. या ग्रंथामुळे होळकर घराण्याच्या अप्रकाशित कुळाची पूर्वपीठिका, अहिल्यापती खंडेराव होळकर यांच्या युद्धमोहिमा, सुभेदार मल्हारराव होळकर आणि अहिल्यादेवींचे गुरू-शिष्याचे नाते, अमेरिकन सेनाधिकारी बाईड यांच्या नेतृत्वात अहिल्यादेवींनी उभारलेली आधुनिक कवायती फौज, समकालीन पंडित, शाहीर, कवी यांनी अहिल्यादेवींवर रचलेले काव्य, राजपूत राजांनी भेट म्हणून दिलेल्या गावांची माहिती सांगणारे ताम्रपट, अप्रकाशित पत्रे आणि शिलालेख या संशोधकांनी नव्याने शोधलेल्या विषयांवरही लेख आहेत. शिवाय, अहिल्यादेवींविषयी विदेशी अभ्यासकांनी लिहिलेली माहिती आणि काव्यही, या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.
 
3) ‘स्त्री ते देवत्वापर्यंत प्रवास’ असे या ग्रंथाचे उपशीर्षक आहे. त्या अनुषंगाने तुम्ही हा प्रवास कसा चितारला आहे?
 
- अहिल्याबाई या त्यांच्या कारकिर्दीतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी म्हणून भारतीय प्रजेच्या मनात देवत्वाला पोहोचलेल्या होत्या, हे त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातील ऐतिहासिक कागदपत्रांमधून समोर आले आहे. याविषयी तत्कालीन माळव्याचा ब्रिटिश अधिकारी जॉन माल्कम यानेही लिहून ठेवले आहे. याविषयी ग्रंथात एक विस्तृत लेख आहे. याशिवाय, महादजी शिंदे, तुकोजी होळकर, नाना फडणवीस यांच्या जोडीलाच राजपूत राजे, निजाम, टिपूसारख्या विरोधकांनीही अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला होता. या लोकोपयोगी कार्यामुळेच प्रजा त्यांना देवी मानू लागली. त्या कार्याचा आढावा घेणारे, मूल्यमापन करणारे महत्त्वाचे लेखही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. हे लेख वाचले की, अहिल्यादेवींच्या जीवनाला ‘स्त्री ते देवत्वापर्यंत’ हे शीर्षक का दिले आहे, याचे सहज आकलन होते.
 
4) सदर लेखनप्रपंच करताना कुठल्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
 
- हा लेखनप्रपंच करताना संदर्भ साधने शोधणे आणि ती मिळवणे, हे एक मोठे आव्हानच होते. आजही अनेक नामंकित ग्रंथालयांतही अहिल्यादेवींसंबंधित प्रकशित साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे यापूर्वी या विषयावर लेखन केलेल्या लेखकांचा शोध घेऊन, त्यांना भेटून, त्यांनी जमवलेले संदर्भ साहित्य मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागले. यामुळे आधी ठरवलेल्या कालमर्यादेत हा ग्रंथ पूर्ण होऊ शकला नाही. दुसरे आव्हान, या ग्रंथासाठी जवळपास एक हजार ऐतिहासिक पत्रांचे वाचन केले होते. या पत्रांची मराठी भाषा ही 17व्या - 18व्या शतकातील असल्यामुळे, त्यातील अनेक शब्दांचे अर्थच लागत नव्हते. यात ऐतिहासिक शब्दांचा शब्दकोश घेऊन, प्रत्येक अनोळखी शब्दाचा अर्थ बघून पत्रांमधील मजकूर आणि आशय समजून घ्यावा लागला. शेवटी ग्रंथाची पृष्ठसंख्या ही जवळपास 550 पर्यंत पोहोचली होती. त्यामुळे एकाच विषयावरचे काही लेख गाळावे लागले. काही लेख महत्त्वाचा आशय सांगणारे, परंतु सर्वसामान्य माणसाला अवघड वाटेल अशा प्रकारे लिहिलेले होते. त्यात जागोजागी सुधारणा करणे हेही एक आव्हानच होते. शेवटचे आव्हान हे कुठल्याही बाह्य आर्थिक पाठबळाशिवाय होणारे ग्रंथ प्रकाशन! अहिल्यादेवींविषयी ग्रंथ प्रकशित करण्याची असलेली तळमळ, यामुळेच या सगळ्या आव्हानांना यशस्वीपणे तोंड देता आले.
 
5) या पुस्तकात लोकसाहित्य, लोककथा यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे का?
 
- होय. या पुस्तकात अहिल्यादेवींचे समकालीन असलेले पंडित, कवी आणि शाहीर यांचे साहित्याचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे. यात हिरालाल शर्मा यांनी गोळा केलेल्या लोककथा, पंडित खुशीराम भट यांनी अहिल्यादेवींच्या आज्ञेने रचलेले संस्कृत भाषेतील ‘अहिल्याकामधेनू’ हे काव्य, श्रीधर चौबे यांनी रचलेले हिंदी काव्य, शाहीर प्रभाकर यांनी रचलेला पोवाडा, पंडित मोरपंत यांनी रचलेले काव्य यांचा समावेश आहे. याशिवाय, जोना बेली या विदेशी महिलेने 1849 साली अहिल्यादेवींवर इंग्रजी भाषेत रचलेल्या काव्याचाही या ग्रंथात समावेश केला आहे.
 
6) अहिल्यादेवी होळकर यांचे विचार बदललेल्या काळासाठी कितपत सयुक्तिक वाटतात?
 
- अहिल्यादेवींचे विचार प्रत्येक काळासाठी संयुक्तिक आहेत. आजही महेश्वरच्या वाड्यावर अहिल्यादेवींनी राज्यकारभार करताना घेतलेली प्रतिज्ञा लिहलेली आहे. या प्रतिज्ञेत त्या म्हणतात, ”माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे मी येथे जे जे काही करत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे. परमेश्वराने ज्या जबाबदार्‍या माझ्यावर सोपवल्या आहेत, त्या मला पार पाडावयाच्या आहेत.” हा विचार आजच्या राज्यकर्त्यांनीच नाही, तर प्रत्येक नागरिकाने आचरणात आणला, तरीही या देशात पुन्हा रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही हे निश्चित. याशिवाय, अहिल्यादेवींनी प्रजेच्या सोयीसाठी केलेले जलव्यवस्थापन, तीर्थस्थानांची उभारणी आणि दुरुस्ती, भिल्ल आदिवासींविषयीची त्यांची धोरणे, न्यायदान करताना असलेला निष्पक्षपाती भाव, परिस्थितीनुरूप सैन्याचे आधुनिकीकरण यांसारख्या विविध विषयांमधील अहिल्यादेवींचे विचार हे आपल्याला प्रेरणादायीच आहेत, यात वाद नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0