ठाणे: जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात विकसित दि.29 मे 2025 त दि. 12 जून 2025 या कालावधीत 15 दिवस राबविण्यात येणाऱ्या विकसित कृषी संकल्प अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या हस्ते आज हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.
यावेळी मुंबई पशूवैद्यकीय महाविदयालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश इंगोले, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख डॉ.सुरेश जगदाळे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, तहसीलदार सचिन चौधर, कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ञ प्रा.डॉ. सलील हांडे, प्रा.डॉ. सौ.मयुरा गोळे, डॉ.संग्राम चव्हाण, डॉ.संजय कदम, प्रा.डॉ.प्रमोद मेश्राम,डॉ. प्रशांत सुर्यवंशी, प्रा.डॉ. जगदीश गुडेवार प्रा.डॉ. फरांदे व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
हे 15 दिवसाचे प्रसिद्ध कृषी संकल्प अभियान दि.29 मे ते दि. 12 जून 2025 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या असून यामध्ये मुरबाड, कल्याण, शहापूर, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यातील अंतर्गत दररोज 6 म्हणजेच एकूण 90 गावांमध्ये गावांमध्ये माफसू चे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या तसेच पशुपालकांच्या भेटी घेणार आहेत. शेतकऱ्यांना, पशुपालकांना त्यांचा पशुसंवर्धन विषयक व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने बनविलेल्या माहिती पुस्तिकेचा अनावरण जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याहस्ते आज झाले.
महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ च्या माहिती पुस्तिकेमध्ये गोचीड निर्मूलन, जनावरांचे लसीकरण, शेळीपालन, मूर घास कसा बनवावा, यशस्वी दुग्धव्यवसाय शास्त्रोक्त पध्दतीने करण्याबाबत, संकरीत चारा लागवड कशी करावी, पंरपरागत कृषि विकास योजना सेंद्रीय शेती करीता जैविक खते व पिक संरक्षण औषधे,शास्त्रोक्त पध्दतीने वासरांचे आहार व्यवस्थापन, निकृष्ट चाऱ्याची प्रत वाढविण्यासाठी खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान, लंपी चर्मरोग ग्रस्त जनावरांची करावयाची सुश्रुषा अशा अनेक विषयावर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प कृषी मूल्य साखळी विकासाचा उपक्रम, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) योजनेचे स्वरुप, ॲग्रीस्टॅक उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार ओळख क्रमांक आदी विषयक माहिती शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी जनजागृती वाहनांद्वारे प्रसिध्दी करण्यात येत आहे.
या मोहिमेची मुख्य वैशिष्टे : समृध्द शेतकरी राष्ट्राचा अभियाना मध्ये खरीप पिकांसाठी नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देणे, नैसर्गिक (सेंद्रिय) शेती पध्दतींना प्रोत्साहन देणे, माती आरोग्य कार्डावर आधारित पीक निवडीचे मार्गदर्शन करणे, खंताचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन देणे,आयसीटी साधने आणि आधुनिक उपकरणांचा वापर करुन स्मार्ट शेतीला प्राधान्य देणे, शेतकऱ्यांपर्यत सरकारी योजनांची व्यापक पोहोच सुनिश्चित करणे, कृषी ड्रोनचे थेट प्रात्यक्षिक, पीक विविधीकरण आणि यंत्रावर आधारित शेतीचे मॉडेल, शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचा थेट संवाद, शेतकऱ्यांच्या नवोपक्रमांना प्रोत्साहन आदी विषयांवर शेतकऱ्यासांठी फायदा होण्यासाठी ही जनजागृती सुरु आहे.
तसेच वरील 90 गावा सोबतच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू ) संपूर्ण महाराष्ट्रभर सदरील अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यात सहभागी झालेले आहे. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे संपूर्ण कोकण विभाग तसेच नंदुरबार, नाशिक आणि धुळे जिल्ह्य साठी एक जिल्हा एक अधिकारी या अंतर्गत प्रतिनिधी ची नेमणूक केलेली आहे जेणे करून विद्यापीठा अंतर्गत झालेल्या संशोधनाचा शेतकऱ्यांच्या बांधावर, पशुपालकांच्या गोठ्यापर्यंत प्रसार होईल.