बालकलाकारांच्या मते... - भाग १

31 May 2025 22:09:00
बालकलाकारांच्या मते... - भाग १


नाटक ही कला प्रेक्षकांच्या मनालाच स्पर्श करते असे नाही. कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला बदल घडवते. असंख्य कलाकारांच्या लहानमोठ्या सवयी नाट्यकलेच्या सहवासात बदलल्या आहेत. मग, बालनाट्य याहून भिन्न कसे राहील. बाल कलाकारांच्या आयुष्यातही नाट्यकला असाच प्रभाव टाकते, तो नेमका काय? याचा बालकलाकारांच्या शब्दात घेतलेला हा आढावा...


मागच्या लेखात काही ठराविक दहा मुद्दे मांडले होते. आजच्या लेखातून बालकलाकारांचे त्यावर काय मत आहे, ते स्पष्ट होणार आहे. वेदांत ठक्कर, सर्वज्ञ आणि समीर गुमास्ते ही मुले माझ्याकडे, गेली दोन ते तीन वर्षे नाट्यकला शिकायला येत आहेत. त्यांना नाटक करायलाही प्रचंड आवडतं. ही गुणी मुले नाट्यकलेचे प्रामाणिक विद्यार्थी आहेत. मी त्यांचा सर्वांगीण विकास होताना पहिला आहे. या मुलांनी बर्याच नाटकांत काम केले आहे. पण तिघांनीही ‘सियावर रामचंद्र की जय’ हे बालमहानाट्य केलं. वेदांतने प्रभू श्रीरामाचे, सर्वज्ञने एकदा रावण, तर एकदा हनुमान आणि समीरने रावणाची भूमिका केली आहे. हे तिघंही ११ ते १३ वयोगटातले असून, या मुलांनी व्यक्त केलेले काही मुद्दे आजच्या लेखात, तर बाकी मुद्दे पुढल्या लेखातून तुम्हाला वाचायला मिळतील.



१. भाषा कौशल्य


वेदांत - मी रंगमंचावर येऊन काहीही बोलायला आधी घाबरायचो. मी भीतभीतच नाटकात भाग घेतला. पण हळूहळू भीती गेली. आधी मी मित्रांशीच बोलायचो पण, आता मी कोणाशीही संवाद साधतो. तसेच मराठी माझी मातृभाषा नसूनही, आता मी मराठी चांगलं बोलतो.


सर्वज्ञ - तीरा नावाचं नाटक आपण केलं होतं. मला इंग्रजीची खूप म्हणजे खूपच भीती वाटायची. पण नाटकाची सुरुवातच माझ्या वायापासून केलीस. मला नको नको वाटत होतं पण, नंतर मला भाषा आवडायला लागली. माझ्या बाबांचे बॉस यांच्याशीही मी इंग्रजीत संवाद सााधला. मला स्वतःलाही आश्चर्यच वाटलं. इतका बदल माझ्यात या एका नाटकामुळे झाला होता.


समीर - मला लोकांशी बोलायचा, संवाद साधायची कधीच समस्या नव्हती. पण हिंदी भाषेत ती होती. मात्र, आता मी हिंदी भाषा सहज बोलू शकतो. माझ्या हिंदी भाषिक मित्रांबरोबर माझा संवाद वाढल्याचेही मला जाणवते. कारण संवाद सधताना माझ्यात एक सहजता आली आहे आणि मला मीच जास्त आवडायला लागलो. कारण माझा संपर्क वाढला असून, मित्रही वाढले आहेत.


२. संकल्प ते सिद्धी


वेदांत - रामाची भूमिका दिल्यावर मला वाटलं, मोठी जबाबदारी दिली आहेस तू. मी झोकून देऊन काम केलं, मेहनत केली आणि जेव्हा माझ्या मेहनतीचं फळ मला मिळालं, तेव्हा मला खरंच रडू आलं. ते अश्रू आनंदाचे होते. फक्त तुला विश्वास होता, की मी करू शकेन. मग मलाही वाटायला लागलं. आणि आपण खरंच छान केलं.


सर्वज्ञ - आरशासमोर उभा राहून वाय म्हण. तू कोण आहेस, याचा अभ्यास कर, भूमिका समजून घे, तुझं हे म्हणण ऐकल मग आपोआपच मला हनुमानाचे बळ मिळाल्यासारखं वाटलं. त्याची गोष्टही माझी वाटायला लागली. हनुमानाला मला प्रेक्षकांसमोर उत्तमरित्या सादर करायचं आहे, हे मी मनोमन ठरवलं होतं.


समीर - रावण दुष्ट होता पण पराक्रमी होता. त्याच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती होती. तो बलवान ही होता, मग आपण का नाही? मी कष्ट करायला शिकलो आणि अशय असं काहीच नसतं रॅडी. मला आधीच माहीत होतं की, माझी तालीम योग्य दिशेने सुरू आहे. जेवढा राम लक्षात राहतो, तितकाच रावणसुद्धा प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि तसं झालं, याचाच मला आनंद आहे.



३. आत्मविश्वास


वेदांत - प्रयोगागणिक माझा आत्मविश्वास वाढला. जसजशी प्रयोगांची संख्या वाढली, तसतसा माझा आत्मविश्वाससुद्धा वाढत गेला.


सर्वज्ञ - आधी मी रावण करत होतो, मग हनुमान करायला लागलो. लोक म्हणतात, रावणही मस्त होता तुझा. पण मला हनुमान करायला जास्त मजा आली. मला वाटतं मी हनुमानाशी जास्त जवळीक साधू शकलो आणि हनुमान करताना माझा आत्मविश्वास जास्त होता. पण का कोण जाणे, मी हनुमान केल्यानंतर शांत झालो आहे आणि असं वाटतं, मी अजून चांगलं करू शकतो. नाटक असो वा अभ्यास.


समीर - मला आत्मविश्वासाची कमतरता तशी कधी जाणवली नाही, कारण मी तालमी खूप केल्या. जोपर्यंत जमत नाही, तुला आवडत नाही, तोपर्यंत मी थांबलो नाही. पण माझ्या एन्ट्रीला, आपल्या नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला, प्रत्येक सीनला टाळ्या पडल्या. शेवटी सगळे प्रेक्षक उठून उभे राहिले, तेव्हा असं वाटलं हो, आपण काहीतरी विलक्षण केलं आहे आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडलं आहे. यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला.


४. संवाद कौशल्य


वेदांत - माझ्या मित्रांनी जेव्हा नाटक पाहिलं नव्हतं तेव्हा माझे मित्र, माझं बोलणं मनावर घ्यायचे नाहीत. पण त्यांनी नाटक पाहिलं आणि त्यानंतर माझी प्रत्येक गोष्ट ते मनावर घ्यायला लागले. त्यांना माझ्या बोलण्यावर जास्त विश्वास बसायला लागला. ते माझं ऐकायला लागले.


सर्वज्ञ - तू सांगतेस ना, क्रिया, प्रक्रिया, कृती, प्रतिकृती यावर सगळं अवलंबून असतं. आधी मी खूप हातवारे करायचो, सारखे पाय हलवत बोलायचो. पण ते थांबवलं आणि मित्र माझ्या बोलण्याकडे जास्त लक्ष द्यायला लागले आहेत रॅडी. मी आता लोकांना फार बारकाईने बघायला लागलो आहे. आपल्याला जर परिणाम साधायचा असेल, तर आपले हातवारे, हावभाव आणि बोलण्याची गती यात ताळमेळ हवा आणि मला ते जमायला लागलं आहे.


समीर - रॅडी, तू सांगितलंस बघ, रावण असा आवेगात का बोलत आहे, याचा विचार कर. राम बोलत असताना शब्द कसे वापरतो, याचा विचार कर. मी लोक आपल्याशी बोलतात, कसं बोलतात, याचाही विचार करतो आणि मग हळूच आपलं म्हणणं पटवून देतो. मागे प्रिन्सिपल मॅडमनी आम्हाला बोलावलं होतं. तेव्हा मी त्यांना माझी मतं सांगण्याआगोदर आमचा संवाद कसा असेल, याची घरी तालीम करून गेलो होतो. मी त्यांचं मन जिंकू शकलो.


५. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास


वेदांत - निश्चितच मी स्वतःला आरशात बघतो, तेव्हा मला मस्त वाटतं. माझ्यात खूप बदल होताना दिसतात. मी रामासारखा शांत झालो आहे. मला शिस्तसुद्धा लागली आहे. पण माझी रामासारखं उभं राहण्याची सवय काही जात नाही. अचानक मला लक्षात येतं की मी वेदांतसारखा नाही, रामासारखा उभा आहे. पण मला खात्री आहे तीही सवय जाईल.



सर्वज्ञ - रॅडी, मीसुद्धा कधीकधी रावणासारखा ऐटीत चालतो. विकास म्हणजे कसा ते मला माहीत नाही, पण मला सगळे म्हणायला लागले आहेत की तू खूप बदललास, छान दिसतोस, राहतोस. कदाचित हे नाटकामुळेच असेल, असं मला वाटतं.



समीर - नाटकाने मला शिस्त शिकवली. वेळेवर येणं, आपल्या कामावर लक्ष देणं, सांगितलेलं काम करणं आणि हे करत असताना मला कसलंही दडपण नाही. मी आनंदी राहायला लागलो आहे. निदान नाटक करत असतो, त्या काळात मी जास्तच आनंदी असतो.



स्वप्नांचे मनोरे बांधत बाल कलाकारांच्या मतांशी सहमत होत, मी हरवले आमच्या रंगांच्या दुनियेत. जिथे मी स्वप्न खरी होताना पाहिली आहेत, स्वप्नांना नवे पंख मिळालेले पाहिले आहेत. तर बाल कलाकारांच्या पंखांना बळ मिळाल्याचं दृश्य मी रोज पाहते.




रानी राधिका देशपांडे
Powered By Sangraha 9.0