'ब्लेम गेम' न करता समन्वयाने काम करा!

31 May 2025 19:47:27

मुंबई,  "पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही, यासाठी समन्वयाने काम करा. 'ब्लेम गेम' करीत बसू नका, मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करा", असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शनिवार, दि. ३१ मे रोजी दिले. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय रेल्वेतून प्रवास करून प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरून कामांची पाहणी केली.

मंत्री आशिष शेलार यांनी शनिवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात दोन्ही रेल्वे, महापालिका, मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस, म्हाडा, एस आर ए आणि संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दोन्ही रेल्वेच्या हद्दीत करण्यात आलेल्या नालेसफाईसह मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीला मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई पोलीस आयुक्त, पश्चिम आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, मुंबई शहर व उपनगर जिल्हाधिकारी, लोहमार्ग पोलीस आयुक्त, म्हाडाचे मुख्याधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


या बैठकीनंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भांडूप दरम्यान उपनगरीय लोकलने प्रवास केला. मशिद बंदर, सँडहर्ट रोड ते भायखळा दरम्यान रेल्वे ट्रॅकवर उतरून नालेसफाई कामांची पाहणी केली. तसेच सायन रेल्वे स्टेशनवर बसवण्यात आलेले पंप, कुर्ला, विक्रोळी तसेच भांडूप आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आलेली कामे आणि पंप याची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेवर ८१२ कल्व्हर्ट आहेत, त्यापैकी ७५० कल्व्हर्टची साफसफाई झालेली आहे. उरलेल्या कल्व्हर्टची साफसफाई लवकरात लवकर करण्यात यावी. रेल्वे मार्गावरील हद्दीतील ६३७ धोकादायक झाडांपैकी ५५० झाडांच्या फांद्या तोडण्याची कारवाई झालेली आहे. बाकीच्या झाडांच्या फांद्या देखील लवकर तोडण्यात याव्यात. मध्य रेल्वेने गेल्यावेळी ९६ ठिकाणी पंप्स इन्स्टॉल केले होते ते यावेळी वाढवून १७७ पंप्प्स केले आहेत त्यांचे टेस्टींग वेळीच पूर्ण करावं असे निर्देश संबंधितअधिकाऱ्यांना दिले.


रेल्वे प्रशासनाने जवळ जवळ ३६ ठिकाणी पुराचे मोजमाप करणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत. त्यापैकी ५ ऑटोमॅटिक डिजिटल आहेत आणि १२ मॅन्युअल आहेत. यांचं कोऑर्डिनेश बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी करणं आवश्यक आहे. कारण रेल्वे ट्रॅकवर पडणारा पाऊस आणि त्याचा निचरा याचे मोजमाप रेल्वे यंत्रणा करते पण पंप लावून ते पाणी बाहेर टाकणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या आणि नाल्यांची व्यवस्था महानगरपालिका करते. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्वय साधण्याबाबत निर्देश दिले.


२४ धोकादायक इमारतींचा विषय मुख्यमंत्र्यांना कळवणार - महानगरपालिकेने रेल्वे हद्दीतील मशिद बंदर, सँडहर्ट रोड दरम्यानच्या २४ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांना याविषयाबाबत अवगत करुन निर्णय करण्याबाबत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश देण्याबाबत विनंती करणार आहे. मरिन लाईन्स आणि रेल्वेच्या बाहेरचे स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स आणि कोस्टल रोडच्या कामामध्ये साफ करणारे ड्रेन्स यांबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थांमध्ये समन्वय साधण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

पोलिसांनी डिझास्टर प्लॅन बनवावा

- पावसामध्ये रेल्वे स्थानकात स्लो झालेली ट्रेन आणि त्यामुळे प्रवाशांची होणारी दाणादाण आणि वाढणारी गर्दी या स्थितीवर उपाययोजना म्हणून स्थानिक रेल्वे पोलिसांबरोबर मुंबई महानगरपालिकरेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने समन्वय साधावा.

- ३ मिनिटात येणाऱ्या रेल्वेला थोडा उशीर झाला तर प्रवाशांची संख्या वाढते अशा वेळेला कोणताही अन्य प्रसंग घडू नये म्हणून रेल्वे स्टेशनवर अशी परिस्थिती झाल्यास एक डिझास्टर प्लॅन बनवावा ज्यामध्ये बीएसटीच्या बसेसची वाहतूक सेवेची मदत घ्यावी. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संबंधित स्थानकांवर अशी उपाययोजना करावी, अशी सूचना पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली.


Powered By Sangraha 9.0