मुंबई : आपण जे पेरले तेच उगवते. आज आपण प्लास्टिक पेरत असून भविष्यात याचे प्रचंड गंभीर परिणाम दिसणार आहेत. त्यामुळे ते थांबवण्यासाठी एकल प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्या वापरा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवार, ३१ मे रोजी केले.
मंत्री पंकजा मुंडे यांनी एकल प्लास्टिक वापरबंदी आणि प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असून श्री सिद्धीविनायक मंदीर येथे त्यांनी भाविक भक्तांना कापडी पिशव्यांचे वाटप केले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी,
हे वाचलंत का? - अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "पर्यावरण मंत्री म्हणून मी जी मोहिम हाती घेतली त्या अनुषंगाने काल पुण्यात कार्यक्रम घेतला आणि आता मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन तो कार्यक्रम निर्विघ्न आणि यशस्वीपणे पार पडावा यासाठी प्रार्थना केली आहे. या मोहिमेत श्री सिद्धीविनायक ट्रस्टलासुद्धा सोबत येण्याची विनंती केली आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे. एकल प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद व्हावा यासाठी आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत आहोत."
"आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या काळात राज्य कारभार करताना पर्यावरणाचे संतूलन राखण्याचे जे काम केले तेच आता करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आज सुवर्णयोग साधून मी इथे आले आहे. एकल प्लास्टिक बंद व्हावे आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबावा यासाठी आम्ही वेगवेगळ्या देवस्थानांना सोबत घेत आहोत. देवस्थाने, मेडिकल कॉलेज, शालेय शिक्षण, मेडिकल स्टोर यासह वेगवेगळ्या संस्थांमध्ये आम्ही हे प्रयोग करून त्यांना सोबत घेत आहोत," असेही त्यांनी सांगितले.
मंदिराच्या बाहेर दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत वस्तू देणे, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये प्रसाद आणणे या गोष्टी टाळल्यास यातून मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते. तसेच मंदिरांमधील निर्माल्यांमधून प्लास्टिक बाजूला काढून ते पुनर्वापरास दिल्यास फार मोठी मदत होईल. देवस्थानांमध्ये लोकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे इथून सुरुवात केल्यास ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल, असेही त्या म्हणाल्या.
प्लास्टिकच्या कंपन्या बंद करण्यासाठी कठोर पावले उचलणार!
"प्लास्टिकच्या कंपन्या बंद करण्यासाठी आम्ही कठोर पावले उचलत आहोत. त्याठिकाणी अवैधरित्या प्लास्टिक बनवले जात असून ते बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्लास्टिक बॅग स्वस्त मिळत असल्याने भाजीवाले, फळवाले, फुलवाले त्या वापरतात. परंतू, आपण घरातूनच कापडी पिशवी घेऊन आलो तर ते योग्य होईल. माझा सत्कार कुणीही शाल श्रीफळ देऊन करू नका. त्याऐवजी मला कापडाची पिशवी द्या. एकल प्लास्टिकचा वापर टाळा. कारण ही काळाची गरज आहे," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.