निलेश चव्हाण शिवाजीनगर कोर्टात हजर! सुनावणीत काय घडलं?

31 May 2025 11:54:07
 
Nilesh Chavan
 
पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या निलेश चव्हाणला शुक्रवारी नेपाळमधून अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवार, ३१ मे रोजी त्याला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर निलेश चव्हाण गेल्या १० दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथके तर पुणे पोलिसांची तीन पथके राज्यासह देशात त्याचा शोध घेत होते. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बावधन पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शुक्रवारी त्याला नेपाळ सीमेवरून ताब्यात घेण्यात आले.
 
दरम्यान, शनिवारी पहाटे त्याला पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर निलेश चव्हाणला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले आहे. निलेश चव्हाणच्या चौकशीसाठी पोलिसांकडून त्याला ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. तर निलेश चव्हाणचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असा युक्तीवाद निलेशच्या वकीलांनी केला आहे.
 
कोर्टाने निलेश चव्हाणला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. निलेश चव्हाण हगवणे कुटुंबाचा नातेवाईक नसताना त्याच्याकडे वैष्णवीचे बाळ कसे गेले यासह इतर अनेक बाबींचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0