मुंबई, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपने संघटनात्मक बळकटीसाठी दुसऱ्या टप्प्यात २२ जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे. यामध्ये राज्यभरातील महत्त्वाच्या शहरी आणि ग्रामीण जिल्ह्यांचा समावेश आहे.
शनिवार, दि. ३१ मे रोजी याबाबतची यादी जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र भाजपने घोषित केलेल्या नावांमध्ये पालघर जिल्ह्यासाठी भरत राजपूत, तर वसई विरारसाठी प्रिया पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अहमदनगर शहराचे जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते असतील. नाशिक विभागात तीन नावे जाहीर करण्यात आली आहेत. नाशिक शहरासाठी सुनील केदार, नाशिक दक्षिणसाठी सुनील बच्छाव आणि नाशिक उत्तरसाठी यतीन कदम यांची निवड झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीसाठी शेखर वढणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात विजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीसाठी रमेश बारसागडे, चंद्रपूर शहरासाठी सुभाष कासमगुंडवार, चंद्रपूर ग्रामीणसाठी हर्ष शहा आणि वर्ध्यासाठी संजय गाते यांची नियुक्ती झाली आहे.
मराठवाडा विभागातही अनेक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परभणी ग्रामीणसाठी सुरेश भुंबरे, संभाजीनगर शहरासाठी किशोर शितोळे, लातूर शहरासाठी अजित पाटील कन्हेकर आणि लातूर ग्रामीणसाठी बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड उत्तरसाठी अॅड. किशोर देशमुख, तर नांदेड दक्षिणसाठी संतुकराव हंबड यांना जबाबदारी देण्यात आली आहे. बीडसाठी शंकर देशमुख यांची निवड झाली आहे.
मुंबईत कोणाला संधी?
मुंबई विभागातही नवीन नियुक्त्या झाल्या असून उत्तर पश्चिम मुंबईसाठी ज्ञानमूर्ती शर्मा, दक्षिण मध्य मुंबईसाठी निरज उभारे आणि शलाका साळवी यांची निवड करण्यात आली आहे. याआधी उत्तर मुंबईत दीपक तावडे, उत्तर मध्य मुंबईत वीरेंद्र म्हात्रे आणि ईशान्य मुंबईत दीपक दळवी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.