नवी दिल्ली : (Kolkata police arrested Sharmistha Panoli) सोशल मीडियावर इस्लामिक दहशतवादाचा निषेध करताना केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आलेली हिंदू सोशल मीडिया इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पानोली हिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्रामहून अटक केली आहे. याप्रकरणी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप असून, कोलकात्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
शर्मिष्ठाने १४ मे रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तिने पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया दिली होती. तिने ‘ऑपरेशन सिंदूर’ या भारतीय लष्कराच्या कारवाईचे समर्थन करताना एका पाकिस्तानी मुस्लिम सोशल मीडिया युजरच्या पोस्टवर रोष व्यक्त केला होता. त्यानंतर तिच्यावर इस्लाम व पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत कथित अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला.
तिच्या व्हिडिओनंतर दोन्ही देशांतील काही मुस्लिम सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला बलात्कार व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. इस्लामिक कट्टरपंथीयांचा जमाव शर्मिष्ठाला 'ऑनलाइन डॉक्सिंग'ची शिकार बनवू पाहत होते. यानंतर शर्मिष्ठाने संबंधित व्हिडिओ हटवून बिनशर्त माफी मागितली होती. तरीदेखील कोलकाता पोलिसांनी १५०० किमीचा प्रवास करून ३० मे रोजी गुरुग्राममधून तिला अटक केली. पोलिसांकडे कोणतेही अटक वॉरंट नसल्याचे म्हटले जात असले तरी, त्यांनी दंडाधिकाऱ्याचा आदेश दाखवून अटक केली असल्याची माहिती मिळाली आहे.
कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शर्मिष्ठाविरुद्ध याआधीच धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल होती. तिचा पत्ता आणि संपर्क नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार अटक वॉरंट काढण्यात आले.शर्मिष्ठाच्या वकिलांनी अटकेला विरोध करत तात्काळ जामीनाची मागणी केली होती. मात्र, सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केल्यावर न्यायालयाने ती फेटाळत १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.