नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप-डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत २६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रांतर्गत पावसाळा कालावधीत प्रत्येक आठवड्याला १ दिवस विशेष हिवताप, डेंग्यू जनजागृती शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. शिबिरांना भेटी देणा-या नागरिकांमध्ये हिवताप,डेंग्यू व साथरोगाबाबत प्रभावीपणे जनजागृती करण्यात येत आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रात हिवताप,डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता दिनांक २२ ते ३० मे २०२५ या कालावधीत ५२ जाहीर शिबीरांचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ २१,०६१ नागरिकांनी घेतला आहे. यामध्ये १४३० रक्तनमुने घेण्यात आले आहेत.
या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे यामध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून, तसेच नागरिकांना डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्यासोबत घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थानांची माहिती करून देणे, पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करुन कोरड्या ठेवणे, भंगार साहित्य टायर्स इ. नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे व ताप येताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे, घर व परिसरात स्वच्छता ठेवणे, पाणी उकळून पिणे, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे अशा विविध गोष्टींबाबत नागरिकांना प्रोत्साहित करुन आवाहन करण्यात आले.
तरी आरोग्य विभागाच्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या घरातील व घराभोवतालची डास उत्पत्ती स्थाने नष्ट करणे तसेच आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, आजुबाजूचा परिसर टेरेसवरील भंगार नष्ट करणे आदी बाबींवर लक्ष दिले तर नवी मुंबईत हिवताप,डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.