पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसांपासून तो फरार होता. यादरम्यान, त्याने विविध राज्यांतून प्रवास करत नेपाळ गाठले. अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला शुक्रवारी ताब्यात घेतले असून त्याला ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला?
निलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. निलेश चव्हाणचे नाव गुन्ह्यात आल्यानंतर सर्वात आधी तो मुंबई-कोकण भागात गेला. तिथून तो दिल्लीला गेला. त्यानंतर तो राजस्थान येथे गेला. त्यानंतर तो मध्यप्रदेशमध्ये पोहोचला. पुढे त्याने उत्तर प्रदेश गाठले आणि तिथून तो नेपाळमध्ये गेल्याची माहिती आहे. त्याने चार राज्यांतून प्रवास करत नेपाळ गाठले.
हे वाचलंत का? - निलेश चव्हाण शिवाजीनगर कोर्टात हजर! सुनावणीत काय घडलं?
यादरम्यानचा एका बसमधून प्रवास करत असतानाचा त्याचा व्हिडीओही पुढे आला आहे. यात तो एका बसच्या वरच्या सीटवरून खाली उतरून बाहेर पडताना दिसतो आहे. निलेश चव्हाणच्या शोधासाठी गुन्हे शाखेची तीन पथके रवाना करण्यात आले होते. अखेर शुक्रवार, ३० मे रोजी भारत-नेपाळ सीमेवरील गोरखपूर जिल्ह्यातील एका ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.