नागपूर : अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर कोणती कारवाई करणार? त्यांच्याकडून पैसे परत घेणार का? यावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. शनिवार, ३१ मे रोजी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायला नको होता. सरकारी सेवेत असलेल्या बहिणींनी ते पैसे परत करायला हवे. शासन त्यांच्याकडून ते पैसे वसूल करेलच. काही खात्यांनी चौकशी आणि कारवाई सुरु केली आहे. परंतू, एकंदरीत समाजातील शेवटच्या व्यक्तीकरिता या योजना असून कुठल्याही योजनेचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांनी घेऊ नये. ज्यांनी फायदा घेतला त्यांच्यावर नक्की कारवाई होईल," म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "अपेक्षित नसलेला पण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणारा पाऊस पडला आहे. नुकसानग्रस भागांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक कॅबिनेटमध्ये नुकसानीसंदर्भातील विषय येतो. मंत्रिमंडळ बैठकीत मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन आणि पाणी टंचाई हे विषय आधी असतात. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल," असे आश्वासनही त्यांनी दिले.
प्रताप सरनाईकांचा पिंड मराठीच!
मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "प्रताप सरनाईक काय बोलले आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय लावला हे बघावे लागेल. पण मीरा-भाईंदर किंवा मुंबई उपनगर भागात हिंदी भाषिक लोक राहतात. मराठी ही सर्वांची बोलीभाषा आहे. सकाळी झोपून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आमची मराठी भाषा आहे. प्रताप सरनाईकसुद्धा दिवसभर मराठी बोलतात. त्यांचा पिंड मराठी आहे. पण त्याठिकाणी हिंदी वर्ग बसला असल्याने ते त्यांच्यासमोर हिंदीत बोलले असतील. महायूती सरकारने आणि एनडीए सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक मराठीच्या विरोधात आहे, असे मानन्याचे काहीही कारण नाही," असेही ते म्हणाले.