ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग संकल्पना स्वीकारा : मंत्री पंकजा मुंडे
31 May 2025 16:21:19
पुणे: रिअल इस्टेट डेव्हलपर्स आणि वास्तुविशारदांनी नवीन प्रकल्पांचे नियोजन करताना ’ग्रीन अँड नेट झिरो बिल्डिंग’ संकल्पना स्वीकाराव्यात. कारण पर्यावरणाचा र्हास कमी करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे आवाहन पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. तसेच बांधकाम व्यावसाईकांनी त्यांच्या प्रकल्पांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक संकल्पना आणि तंत्रज्ञान एकत्रित करण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी प्रीफॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचे उदाहरण देत ते धूळ, मोडतोड आणि बांधकाम कचरा कमी करून साइटवरील प्रदूषण कसे लक्षणीयरीत्या कमी करते हे सांगितले.
त्या सीआयआय इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (आयजीबीसी) पुणे चॅप्टरने आयोजित केलेल्या ’ग्रीन पुणे समिट आणि अभिनंदन 2025’ दरम्यान बोलत होत्या. या शिखर परिषदेच्या उदघाटनाला पद्मश्री पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक सदस्य अमिताव मल्लिक, राहुल सहाय, सी. शेखर रेड्डी; डॉ. पूर्वा केसकर; आणि हृषीकेश मांजरेकर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या, बांधकाम उपक्रमांमध्ये पर्यावरणपूरक उपाययोजना लागू करण्यासाठी सरकारकडून नवीन नियम तयार केले जात आहेत. विशेषतः सांडपाणी प्रक्रिया नियमांमध्ये नवीन नियम येत आहेत, असे ही त्यांनी नमूद केले. त्यांनी आयजीबीसी भागधारकांकडून धोरण ठरवताना केलेल्या शिफारशी आणि सूचनांचे स्वागत केले.