नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी ऑपरेशन सिंदूरमध्ये संपूर्ण जगाने भारताच्या स्वदेशी शस्त्रास्त्रांची आणि मेक इन इंडियाची शक्ती पाहिली आहे. त्याचवेळी शत्रू कोठेही असला तरी त्यास उध्वस्त करण्याची भारताची क्षमताही सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे शुक्रवारी केले आहे.
ऑपरेशन सिंदूरने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता आणि मेक इन इंडियाची ताकद जगासमोर दाखवून दिली. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह भारताच्या स्वदेशी शस्त्रांनी अचूक लक्ष्यांवर मारा केला आणि शत्रूच्या प्रदेशात खोलवर विनाश घडवून आणला. ही क्षमता आत्मनिर्भर भारतासाठी भारताच्या वचनबद्धतेचा थेट परिणाम आहे, असे त्यांनी नमूद केले. एक काळ असा होता जेव्हा भारत आपल्या लष्करी आणि संरक्षण गरजांसाठी परदेशी राष्ट्रांवर अवलंबून होता. तथापि, देशाने त्या परिस्थितीत बदल करण्यास सुरुवात केली आहे, संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील आहे. संरक्षणात स्वावलंबन केवळ अर्थव्यवस्थेसाठीच महत्त्वाचे नाही तर राष्ट्रीय अभिमान आणि सार्वभौमत्वासाठी देखील आवश्यक आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला.
भारताला या अवलंबित्वापासून मुक्त करण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू केला, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. ते पुढे म्हणाले, शत्रू कोठेही असला तरीदेखील त्याला शोधून त्याचा खात्मा करण्याची भारताची क्षमता पुन्गहा एकदा सिद्ध झाली आहे. यामध्ये संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याचा मोठा वाटा आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचेही महत्त्वाचे योगदान आहे. कानपूरच्या ऐतिहासिक आयुध कारखान्याप्रमाणेच, सात आयुध कारखाने प्रगत संरक्षण उत्पादन युनिटमध्ये रूपांतरित झाले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान दयेची याचना करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असा पंतप्रधानांनी दिला. यावेळी त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पंतप्रधानांनी भारताची तीन स्पष्ट तत्त्वे मांडली. पहिले म्हणजे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारत निर्णायक प्रत्युत्तर देईल. या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि परिस्थिती केवळ भारतीय सशस्त्र दलच ठरवतील. दुसरे म्हणजे, भारत यापुढे अणु धमक्यांना घाबरणार नाही आणि अशा इशाऱ्यांवर आधारित निर्णय घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारताकडून दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे या दोघांनाही एकाच दृष्टिकोनातून बघितले जाईल.