राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव...; एकत्र येण्याच्या चर्चांवर तटकरेंची प्रतिक्रिया

30 May 2025 13:19:41
 
Sunil Tatkare
 
मुंबई : राज्यात सध्या दोन्ही पवार एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा सध्या कुठलाही प्रस्ताव नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. तसेच प्रस्तावच नसल्याने विरोधाचा प्रश्नच येत नाही, असेही ते म्हणाले.
 
दोन्ही पवार एकत्र येण्यास सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा त्यास विरोध असल्याचा दावा संजय राऊतांनी केला होता. याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा कुठलाही प्रस्ताव नाही. या क्षणापर्यंत विलीनीकरणाच्या प्रस्तावाचा साधा विचारही समोर आलेला नाही किंवा त्याची चर्चाही नाही. त्यामुळे त्या प्रस्तावास विरोध असणे, अनुकूल असणे, प्रतिकूल असणे असा प्रश्नच उद्धवत नाही. प्रस्ताव नसल्याने आज विलीनीकरणाचा विचार नाहीच. आम्ही आमच्या मूळ विचारधारेसोबत एनडीएमध्ये सहभागी आहोत. त्यामुळे देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह यांच्या नेतृत्वाखाली आमचा पुढचा राजकीय प्रवास होणार आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  दोन्ही पवार एकत्र येण्यास कुणाचा विरोध? राऊतांचं म्हणणं काय?
 
काय म्हणाले संजय राऊत?
 
संजय राऊत म्हणाले की, "आजही अजित पवारांचा पक्ष शरद पवार आमचे नेते आहे असे सांगतात. शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे. आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असे ते सांगतात. आपण एकत्र आलो पाहिजेत असेही ते म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाहीत. जो तो आपापला राजकीय फायदा, तोटा पाहत असतो. प्रफुल्ल पटेल हे काही महान नेते नाहीत हे सगळ्यांना माहिती आहे. आता तटकरे हे त्यांच्या एका गटाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष विलीन झाला तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकरेंनी काय करायचे? केंद्रातील मंत्रीपदाचा प्रश्न निर्माण होईल. प्रत्येकजण राजकारणात आपली व्यवस्था, आपली सोय आणि आपला फायदा पाहतो. तसेच हेदेखील आहे," असे ते म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0