‘श्रावणात तुम्ही नवीन घरात राहायला जाल’

30 May 2025 13:13:47

Minister Ashish Shelar assurance to BDD flat holders
 
मुंबई: “महिन्याभरात नवीन घराच्या चाव्या देऊन पहिल्या श्रावणात तुम्ही नवीन घरात राहायला जाल. 24 तास पाण्याचा पुरवठा, आताची व भविष्यातली कार पार्किंग व प्रत्येकाला स्वतंत्र पार्किंगची सोय, येण्या-जाण्यासाठी सुरक्षित रस्ता, गॅस पाईपलाईन, प्रत्येक फ्लॅटच्या विंडोला सुरक्षित जाळी बसवल्या जातील.” असे आश्वासन मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिले.
 
गुरुवार, दि. 29 मे रोजी वरळी ‘बीडीडी पुनर्विकास प्रकल्पा’तील इमारत क्र. एकच्या आठ विंगमधील सदनिकाधारक यांनी त्यांच्या नवीन घराचा ताबा घेण्यापूर्वी काही प्रश्नांसंदर्भात कॅॅबिनेट मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्याकडे दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन, प्रकल्प ठिकाणी रहिवाशांंसोबत त्यांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी सदनिकाधारकांना हे आश्वासन दिले.
 
या बैठकीसाठी भाजप विधानसभा अध्यक्ष दीपक सावंत व विजय बांदिवडेकर तसेच, रहिवाशी प्रतिनिधी सुरेश खोपकर यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा केला. ‘म्हाडा’ मुख्य अधिकारी बोरीकर, धात्रक, वास्तुविशारद विवेक भोळे व सहकारी, टाटा कंत्राटदारचे पाटील, बीएमसी वार्ड ऑफिसर, ‘पीडब्लूडी’ अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
नवीन इमारतीच्या शेजारी लागून असलेल्या ज्या जुन्या चाळी तोडण्याची प्रमुख मागणी रहिवाशांनी केली होती, त्यापैकी निदान दोन चाळी तरी आता तातडीने तोडून त्या ठिकाणची जागा दोन विंगसाठी तात्पुरती पार्किंग व इतर येण्या-जाण्यासाठी सर्वांना वापरण्यात येईल. इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय देताना ‘म्हाडा’ मुख्य अधिकारी बोरीकर यांनी उपस्थितांचे समाधान केले.
 
पोलीसलाईनमधील बीडीडीवासीयांची लॉटरी होऊनही अद्याप न झालेला करार व सध्या असलेल्या पाण्याच्या समस्येबाबतदेखील संबंधित अधिकार्‍यांना अंमलबजावणी करण्याबाबत निर्देश मंत्री अ‍ॅड. शेलार यांनी दिले. आपल्या मागण्या मान्य केल्याबद्दल रहिवाशांनी मंत्री शेलार आणि प्रशासनाचे आभार मानले.
 
 
Powered By Sangraha 9.0