India-Pakistan Conflict : आयातींनंतर आता पाकिस्तानी जहाजांनाही भारतीय बंदरात 'नो एन्ट्री'! भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका

03 May 2025 19:23:26
 
indias big move bans pakistani ships from ports
 
 
नवी दिल्ली : (Ban On Pakistani Ships) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देणे, अटारी सीमा बंद करणे, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करणे, भारतातील पाकिस्तानी नागरिकांना हद्दपारीचे आदेश देणे, याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्स आणि एक्स हँडल्सवर बंदी घालण्याची कारवाई सुरू केली. अशात पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता भारताने शनिवारी पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.
 
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार, पाकिस्तानी ध्वजधारी जहाजांना भारतीय बंदरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशानुसार भारताच्या ध्वजधारी जहाजांनाही पाकिस्तानातील बंदरांवर डॉकिंग करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयाच्या मते, "भारतीय मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि संबंधित पायाभूत सुविधांच्या - सुरक्षिततेसाठी" ही कारवाई करण्यात आली आहे. हे निर्देश तात्काळ लागू झाले असून, पुढील सूचना येईपर्यंत ते कायम राहतील. अशी माहिती निर्देशांमध्ये देण्यात आली आहे.
 
राष्ट्रहितासाठी पाकिस्तानी जहाजांना प्रवेशबंदी
 
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, "हे पाऊल उचलण्यामागील उद्दिष्ट राष्ट्रीय हितासाठी सर्वात योग्य पद्धतीने भारतीय व्यापारी सागरी जहाजाच्या विकासाला चालना देणे आणि कार्यक्षम देखभाल निश्चित करणे आहे. पाकिस्तानचा ध्वज असलेल्या जहाजाला कोणत्याही भारतीय बंदरात येण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि भारतीय ध्वज असलेल्या जहाजाला पाकिस्तानच्या कोणत्याही बंदरात जाण्याची परवानगी मिळणार नाही. या आदेशातून कोणाला सूट द्यायची की नाही, याचा निर्णय सूट मागणाऱ्याची चौकशी आणि प्रकरणांनुसार घेतला जाणार आहे," असेही आदेशात पुढे म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0