मुंबई: (The era of revival of Indian culture has begun Nita Ambani) “इतर देशांसाठी संस्कृती हा केवळ संवर्धनाचा विषय असतो, परंतु भारतीयांसाठी संस्कृती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचा काळ सुरू झाला आहे,” असे प्रतिपादन ‘रिलायन्स फाऊंडेशन’च्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी केले.
दि. 2 मे रोजी मुंबईच्या ‘जिओ वर्ल्ड सेंटर’ येथे आयोजित ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅण्ड एंटरटेनमेंट समिट 2025’ येथे आपल्या अध्यक्षीय भाषणात नीता अंबानी यांनी भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचा विचार मांडला. भारतीय संस्कृतीचा, तसेच भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार प्रसार सात समुद्रापार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच यावेळी त्यांनी संस्कृतीच्या पुनर्जागरणाच्या कार्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. यावेळी त्या म्हणाल्या की, “विविध तत्त्ववेत्ते, प्रवासी यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार जगाच्या कानाकोपर्यात झाला. जपानसारख्या देशात लक्ष्मण, राम, या भारतीय देवतांची पूजा केली जाते.
भारत ही अद्वैत, वेदांताची भूमी आहे. याच भूमीत योग तत्त्वज्ञान जन्माला आले. हे आपल्या संस्कृतीचे सामर्थ्य आहे. आता पुन्हा एकदा हे संस्कृतीसंचित जगासमोर आणण्याची वेळ झाली आहे. संस्कृती प्रवाही असते, त्यामध्ये खंड पडत नाही. भारतामध्ये आधुनिक आणि पुरातन या दोन विचारांमध्ये संघर्ष नसून, दोन्ही विचार परस्परांना पूरक आहेत. हा समन्वयवादी विचार जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.