कर्नल गोर्दियेव्हस्की हा नुकताच म्हणजे दि. 4 मार्च रोजी वयाच्या 86व्या वर्षी लंडनमध्ये मरण पावला. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे पृथ्वीवर अवतरलेला स्वर्ग आहे, असे मानून देशोदेशींच्या अनेक नामवंतांनी स्वदेशाशी बेईमानी केली. म्हणजे स्वदेशातील गुप्त माहिती सोव्हिएत रशियाला पुरवली. कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की याचे मत नेमके उलटे होते. साम्यवादी राज्यव्यवस्था म्हणजे निखळ गुंडगिरी आहे, हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन कळल्यावर त्याने रशियन गुप्त माहिती ब्रिटनला पुरवली. लेखाच्या या पहिल्या भागात आपण या घटनेचा पूर्ववृतांत पाहू, दुसर्या भागात गोर्दियेव्हस्कीने गुप्त माहिती देण्यासाठी काय काय युक्त्या लढवल्या, याबद्दल जाणून घेऊ.
सन 1988च्या जून महिन्यातली ती एक छानशी संध्याकाळ होती. लंडनच्या वॅक्झॉल क्रॉस परिसरातील ‘एम.आय.6’च्या मुख्यालयात, म्हणजेच ब्रिटिश गुप्तहेर खात्याच्या कार्यालयात नेहमीप्रमाणेच कामे चालू होती. खरे पाहता, आज तिथे प्रचंड जल्लोष असायला हवा होता. विजयदिन साजरा केला जात असायला हवा होता. हाच विजय जर उघड उघड राजकीय किंवा लष्करी क्षेत्रातला असता, तर कदाचित प्रचंड मोठी जाहीर सभा, नेत्यांची भाषणे, लष्करी मानवंदना, संचलने, सैनिकी पथकांच्या थरारक कसरती वगैरे नेत्रदीपक कार्यक्रम झाले असते. पण वॅक्झॉल क्रॉस मुख्यालयात यापैकी कसलाही हासभाससुद्धा नव्हता. कारण, तो गुप्तहेरखात्याच्या एका मोठ्या कामगिरीचा विजय होता. तो गुप्तपणेच साजरा करणे आवश्यक होते. ब्रिटिश हेरखात्याचा एक निवृत्त हेरप्रमुख म्हणतो, “आमच्या अपयशाचे जाहीर वाभाडे काढले जातात; आमच्या यशाचा मात्र कुणालाही पत्ताच नसतो!” हे अगदी खरे आहे. पण त्याला इलाजच नसतो. कारण त्यांचे यश जाहीर झाले, तर शत्रू सावध होणार आणि ज्या मार्गाने ते यश मिळाले, तो मार्ग बंद होणार.
परंतु 1988 सालचे ते यश इतके मोठे आणि इतके दूरगामी परिणाम करणारे होते की, ते साजरे करण्यासाठी एक मेजवानी देणे आवश्यक होतेच. यासाठी ठिकाण मुद्दामच मुख्यालयापासून खूप दूर, उत्तर लंडनमधले एक हॉटेल निवडण्यात आले. ‘एम. आय. 6’चे अनेक उच्चपदस्थ अधिकारी तिथे जमले. सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू होता, एक उंच, धिप्पाड, कपाळावरून केस मागे फिरलेला, चस्मिस टिपिकल राशियन चेहर्याचा वयस्कर माणूस. त्याचे नाव कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्की. सोव्हिएत रशियाच्या ‘केजीबी’ या कुख्यात गुप्तहेरखात्याच्या लंडन कार्यालयाचा प्रमुख.
मेजवानीला अपेक्षित असलेले सर्व लोक जमल्यावर, पाश्चिमात्य पद्धतीनुसार दारूचे ग्लास घेऊन सगळेजण गोर्दियेव्हस्कीभोवती जमले. एकजण म्हणाला,’‘अफगाणिस्तानातून रशियन सैन्याच्या सुरू झालेल्या केविलवाण्या माघारीकरिता...” सगळ्यांनी ’चीअर्स’ म्हणत, ग्लास उंचावून गोर्दियेव्हस्कीला अभिवादन केले. या प्रकाराला ’टोस्ट’ असे म्हटले जाते.
हे सगळे इतक्या सहजतेने, सफाईने झाले की हॉटेलमधल्या इतर बघ्यांना तो माणूस काय बोलला आणि हे सगळे कोण आहेत, याचा कसलाही थांगपत्ता लागला नाही. ‘एम.आय.6’चे ते सगळे अधिकारी मात्र त्या दिवशी कमालीचे खुशीत होते. त्यांना कळून चुकले होते की, ही रशियन सैन्याची नुसतीच माघार नाही; तर एका ‘सैतानी साम्राज्या’च्या, एका ‘एव्हिल एम्पायर’च्या पतनाची सुरुवात आहे आणि खरोखरच आणखी जेमतेम अडीच-तीन वर्षांत ते साम्राज्य कोसळले, 1988 ते 1991. ब्रिटिशांचा आणि लोकशाहीवादी जगाचा एक जबरदस्त शत्रू खलास झाला, खरोखरच हा फार मोठा विजय होता.
ही सगळी काय भानगड आहे, हे नीट समजून घेण्यासाठी आपण इतिहासावर एक वेगवान दृष्टिक्षेप टाकूया. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर, युरोपातल्या देशांमध्ये जग जिंकण्याची स्पर्धा लागली. ती मुख्यतः इंग्लंडने, पण अधिकृत भाषेत इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स हे चार प्रांत मिळून बनलेल्या ब्रिटनने जिंकली. नेपोलियन बोनापार्टने ब्रिटनसमोर जबरदस्त आव्हान उभे केले होते, पण ब्रिटनने त्यालाही यशस्वीपणे संपवले. तेवढ्यात ब्रिटनला जाणीव झाली, रशियाच्या वाढत्या बळाची. रशियन सम्राट म्हणजे झार पीटर द ग्रेट (जन्म-1672, राज्यारोहण-1682, मृत्यू-1725) याने अतिशय योजनाबद्ध रितीने, रशियाला अत्याधुनिक बनवले. त्याला संपूर्ण पूर्व युरोप आणि स्कँडिनेव्हियन देश (नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क) तर हवेच होते, पण रशियाच्या दक्षिणेकडचे कझाकस्तान, उझबेकिस्तान ते अफगाणिस्तानपर्यंतचे सर्व देश जिंकून, थेट भारतापर्यंत पोहोचायची म्हणजे भारत जिंकण्याची त्याची जबरदस्त महत्त्वाकांक्षा होती. त्यासाठी ब्रिटिशांनी अफगाणिस्तान जिंकून, तिकडची सरहद्द सुरक्षित करण्याचे आटोभाट प्रयत्न केले. ते जमेना, मग त्यांनी मुत्सुद्देगिरी चालवून अफगाणांच्या शहाला कायमचा मित्र बनवले.
रशियात 1917 साली साम्यवादी क्रांती झाली. झारशाही संपली. पण, साम्यवादी नेते लेनिन आणि त्याच्याहीपेक्षा स्टालिन, हे झार राजे फिके पडावेत इतके सत्तापिपासू होते. झारशाहीप्रमाणेच साम्यवादी राजवट आणि ब्रिटन यांचे जुने हाडवैर चालूच राहिले, किंबहुना त्याला अधिकच धार चढली.
तेवढ्यात, जग जिंकू पाहणारा एक नवाच महाखलनायक जगाच्या रंगभूमीवर अवतरला. अॅडॉल्फ हिटलर. त्याने निर्माण केलेल्या महाभयानक उत्पाताने, त्याच्या स्वतःच्या देशासकट सगळेच युरोपीय देश खिळखिळे झाले. पण, स्टालिन अधिकच प्रबळ झाला. पाहता पाहता त्याने, संपूर्ण पूर्व युरोप आणि अफगाणिस्तानपर्यंतचे देश आपल्या पंजाखाली आणले. साम्यवादी तत्त्वज्ञान नावाच्या मायावी आवरणाखाली त्याने जगभरच्या विचारवंत, बुद्धिमंतांना भुलवून आपल्या कच्छपी लावले. स्टालिननेच निर्माण केलेल्या ‘केजीबी’ या रशियन गुप्तहेर खात्याने, स्वदेशासकट जगभर विश्वासघात, फंदफितुरी आणि घातपात यांचा नुसता कहर उसळून दिला. साम्यवादाच्या मायावी तत्त्वज्ञानाने भ्रमित झालेले जगभरचे विचारवंत, बुद्धिमंत, साहित्यिक, कलावंत आपापल्या देशाशी बेधडक बेईमानी करायला उद्युक्त झाले. पुढे स्टालिनच्याच काही चेल्याचपाट्यांना त्याची दादागिरी असह्य होऊ लागली. त्यांनी बंड केले. तेव्हा सोव्हिएत रणगाडे दणाणत आले, नि त्यांनी ते बंड अक्षरशः चिरडून टाकले. उदा., 1956 साली हंगेरीचा साम्यवादी नेता इमे्र नागी आणि 1968 साली झेकोस्लोव्हाकियाचा अलेक्झांडर ड्युबचेक यांनी बंड केले. त्याची प्रचंड लष्करी बळावर, साफ वासलात लावण्यात आली. ब्रिटन-अमेरिका दातओठ चावत फक्त बघत राहिले आणि उरलेले जग भयचकित होऊन पाहात राहिले.
1979 साली अफगाणिस्तानात यादवी सुरू झाली. तेव्हा तिथल्या साम्यवादी पक्षाची पाठराखण करायला, पुन्हा एकदा सोव्हिएत रणगाडे काबूलमध्ये उतरले. पण आता हे 1956 किंवा 1968 साल नसून, 1979 साल होते. रणगाड्यांना घाबरायला, पठाण म्हणजे हंगेरियन किंवा झेकोस्लोव्हाक पांढरपेशे नागरिक नव्हते. एक जबरदस्त गनिमी युद्ध सुरू झाले, जे पुढची नऊ वर्षे सतत सुरू राहिले. ओलेग गोर्दियेव्हस्की 1968 सालीच ‘केजीबी’हस्तक म्हणून, डेन्मार्क देशाची राजधानी कोपनहेगनमध्ये कामाला लागला. उत्कृष्ट काम केल्याबद्दल 1973 साली त्याची बढती आणि बदली, लंडन केंद्राचा प्रमुख म्हणून करण्यात आली. डॅनिश गुप्तहेर खात्यामधील सूत्रांमार्फत गोर्दियेव्हस्की, ब्रिटिश गुप्तहेर खात्यातील म्हणजे ‘एम.आय.6’मधील योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचला आणि त्याने ब्रिटनला गुप्त माहिती देण्याचे काम सुरू केले. केवढे आश्चर्य! ‘केजीबी’चा लंडन केंद्रप्रमुख स्वतःहून ब्रिटिश हस्तक बनला. 1950 आणि 60च्या दशकात, हेरॉल्ड अॅड्रियन रसेल ऊर्फ किम फिल्बी हा उच्चपदस्थ ब्रिटिश हेर स्वतः होऊन ‘केजीबी’चा हस्तक बनला होता आणि त्याने फार महत्त्वाची माहिती रशियाला पुरवली होती. हे त्याने केले, यात त्याला देशद्रोह वाटला नाही. कारण तो साम्यवादी होता. आपण हे केलेच पाहिजे, असे त्याला वाटत होते. गोर्दियेव्हस्कीची भूमिका नेमकी त्याच्या उलट होती. साम्यवादी तत्त्वज्ञान आणि त्याहीपेक्षा म्हणजे ‘केजीबी’च्या कारवाया ही चक्क गुन्हेगारी, गुंडगिरी आहे आणि ती संपवलीच पाहिजे, असे त्याच मत बनले होते.
1973 ते 1985 पर्यंत गोर्दियेव्हस्कीने, ‘एम. आय. 6’ला फार मौल्यवान माहिती पुरवली. त्यातला मुख्य भाग हा की, सोव्हिएत रशियन नेते कायम जी दादागिरी करतात, त्यामागे सामर्थ्याचा अहंकार हा भाग नसून युरोप-अमेरिकेच्या विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ते मनातून घाबरलेले आहेत, ही गोष्ट मार्गारेट थॅचर आणि रोनाल्ड रीगन यांना पटवून देणे. 1983 साली रीगन यांनी उघडपणे सोवियत राजवटीला ‘एव्हिल एम्पायर’ म्हटल्यावर तर रशियन नेतृत्वाची पाटलोण सुटायची वेळ आली होती, हे गोर्दियेव्हस्कीकडून ‘एम. आय. 6’ला समजले.
1985 नंतर सगळेच वेगाने बदलले. सत्तेवर आलेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी मे 1988 पासून, अफगाणिस्तानातली पठाणांकडून हग्या मार खाणारी सोव्हिएत सेना काढून घ्यायला सुरुवात केली. 1989 साली त्यांनी, पूर्ण युरोपातल्या आपल्या मांडलिक चमच्यांना वार्यावर सोडले. त्यासरशी पूर्व जर्मनी ते ताजिकीस्तानपर्यंतचे सोवियत साम्राज्य धडाधडा कोसळले आणि 1991 साली तर ‘यूएसएसआर‘ नावाच्या सैतानी राजवटीची संपूर्ण इतिश्री होऊन, ’रशियन फेडरेशन’ हा नवा देश अस्तित्वात आला.
बेन मॅकिंटायर हा एक नवा ब्रिटिश इतिहासकार-लेखक आहे. ‘द स्पाय अॅण्ड द ट्रेटर’ या नावाने त्याने कर्नल ओलेग गोर्दियेव्हस्कीचे चरित्र आणि एकंदर त्या काळाचा लिहिलेला वृत्तांत नुकताच प्रकाशित झाला आहे.