पीएमपी, पीएमआरडीए

    03-May-2025
Total Views |
 
PMP PMRDA
 
पुण्यातील दोन महत्त्वाच्या घटकांच्या कार्यपद्धतीवर पुण्याचे जीवनमान अवलंबून आहे. सध्या यातील ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा‘च्या कारभाराची अवस्था अतिशय निराशाजनक आणि त्यापेक्षाही संतापजनक आहे. पुणे महानगराचा विस्तार गेल्या अडीच वर्षांत अतिशय झपाट्याने वाढला. त्यामुळे येथील दळणवळण व्यवस्था आणि पायाभूत सुविधांची कामे, नजीकच्या परिसरातील बांधकामविस्तार आणि त्यातच स्थायिक होणार्‍या रहिवाशांमुळे, पुण्यातील जीवनमान गतिमान झाले. त्यासाठी या नागरिकांना अतिशय सोयीची आणि सुविधाजनक असलेली बससेवा, हे महामंडळ आजवर पुरवित आले आहे. तथापि, आताची स्थिती बघितली, तर या महामंडळाकडे आलेल्या नव्या बस गाड्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे. ज्या मार्गावरून बस धावत आहेत, त्या मार्गांवर दिवसाला एक ते दोन बस बंद पडण्याचे प्रमाण, गेल्या महिनाभरात वाढले आहे. ज्या बस धावत आहेत, त्यांची अवस्थादेखील अतिशय धोकादायक अशीच.
 
आधीच वाहतुककोंडी आणि त्यात चालकाला अशा नादुरुस्त बस चालवायला लावून, हे महामंडळ वाहनचालक आणि नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. त्यात रोज बसमध्ये होणार्‍या वादांमुळेदेखील, मानसिक स्वास्थ या कर्मचार्‍यांचे ठीक नसते हेदेखील भीषण वास्तव आहे. यात सुधारणा होईल, तो सुदिन म्हणायचे. तथापि, पुण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक असलेले ‘पुणे महानगर प्राधिकरण’देखील, आता कात टाकून कामाला लागले आहे. ‘पीएमपी’पेक्षा या संस्थेचा कारभार तसा नीट चालला आहे. खुद्द मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी या प्राधिकरणाच्या कामाचा आढावा घेऊन योग्य त्या सूचना केल्याने, भविष्यात नागरिकांची अनेक कामे मार्गी लागलेली दिसतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. नुकतीच या प्राधिकणाने आपल्या भविष्यकालीन कार्याची आखणी केली असून त्यानुसार कारभार गतिमान राहिल्यास पुण्यातील नागरिकांच्या सोयीसुविधांत भर पडेल, अशी चिन्हे आहेत. या प्राधिकरणाची विभागीय कार्यालये कालपासून सुरू झाली आहेत.प्राधिकरणाची हद्द ग्रामीण भागात असल्याने नागरिकांना थेट आकुर्डी कार्यालयात यावे लागत असे. आता मात्र नऊ तालुकास्तरीय कार्यालये सुरू झाली आहेत.
 
खरेदीचा ओघ
 
परवाच अक्षय्य तृतीया हा सण झाला. सहसा या पर्वावर नवी वस्तू खरेदी करण्याकडे, नागरिकांचा कल अधिक असतो. पुणे महानगरास अनेकांची दूरवरून पसंती असते. त्यामुळे येथे घर खरेदी करणे हे स्वप्न असते. येथे रोजगार मिळावा म्हणूनही अनेकांची धडपड असल्याने, येथील उद्योगक्षेत्र नेहमीच तेजीत असते. या पर्वावरही आपसूकच खरेदीकडे ग्राहकांचा कल अधिक होता. प्राप्त माहितीनुसार, सोने-चांदी खरेदीकडे ग्राहकांची गर्दी होती, असे निदर्शनास आले. तथापि, वाहनखरेदीसदेखील ग्राहकांनी प्रतिसाद दिला. प्राथमिक माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नव्या वाहनखरेदीदारांच्या नोंदीनुसार, 6 हजार, 610 वाहनांची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी हा आकडा या दिवशी 7 हजार, 191 इतका होता. अर्थात आकडेवारीवरूनन यात घट झाली, असे म्हणता येईल. असे असले तरी, यंदा मोटार कारच्या विक्रीत किंचित वाढ झाली. गेल्यावर्षी 1 हजार, 593 कार विक्री झाल्या होत्या. यंदा हा आकडा 1 हजार 680 इतका आहे.
 
सदनिका खरेदीतदेखील 50 कोटींचा महसूल, पुणे विभागास प्राप्त झाला. येथे 1 हजार, 800 सदनिकांची खरेदी केल्याची माहिती असून, शहरातील 27 दस्तनोंदणी कार्यालयात 1 हजार, 800 दस्तांची नोंद झाल्याची माहिती आहे. ऑटो रिक्षा गेल्यावर्षी 208, तर यंदा 221 विकल्या गेल्या. मालवाहू वाहनांचीदेखील गतवर्षीपेक्षा अधिक विक्री झाली. गेल्यावर्षी ही मालवाहू वाहने 275 विकली गेली होती, तर यंदा ती संख्या 302 वर गेली. टुरिस्ट टॅक्सीच्या विक्रीतदेखील 195 वरून 203 इतकी वाढ झाल्याची नोंद आहे. यावरून एक गोष्ट निश्चित मान्य केली पाहिजे की, रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भतेकडे वळलेले पाऊल हे आश्वासक असेच म्हणता येईल. या मुहूर्तावर सहसा गृहखरेदीस अधिक पसंती दिली जाते. यंदा सरकारच्या महसुलात पुणे विभागात, 50 कोटींची भर पडल्याची प्राथमिक माहिती आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर दिवसभरात झालेली ही नोंदणी आशादायक अशीच आहेे. एकूणच, हे विकसित भारताचे अग्रक्रमाने पुढे जाण्याचे आश्वासक चित्र आहे, असे म्हणता येईल.
 
- अतुल तांदळीकर