मुंबई :(Indians dominate capital market) राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध कंपन्यांच्या मालकी हक्कात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांना मागे टाकले आहे. गेल्या 22 वर्षांत प्रथमच अशी घटना घडली आहे. यावरून भारतीय गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारावर आणि देशाच्या वेगवान प्रगतीवर दाखवलेला विश्वास प्रकर्षाने अधोरेखित होतो.
सध्या व्यापारयुद्ध आणि मंदीसदृश स्थितीचा परिणाम जगातील अनेक देशांच्या भांडवली बाजारांवर सहज दिसून येतो. अनेक देशांचे भांडवली बाजार या परिस्थितीत हेलकावे खात असून काही देशांतील बाजारांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अशातच भारतीय भांडवली बाजार मात्र सकारात्मक स्थितीत आहे. कारण, भारतीय भांडवली बाजारामध्ये असलेली भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक. राष्ट्रीय शेअर बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या मालकी हक्कात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांना मागे टाकल्याचे नुकतेच आकडेवारीतून समोर आले आहे.
सध्या भारतीय भांडवली बाजारामध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 17.22 टक्के असून, भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूक 17.62 टक्के इतकी आहे. म्युच्युअल फंड, विमा कंपन्या आणि पेन्शन फंडांसह देशांतर्गत संस्था गेल्या पाच वर्षांपासून शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. भारतीय बाजाराने उच्च दराचा परतावा देण्यामध्ये सातत्य राखल्याने, भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करणार्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या बचतीचा एक भाग, पारंपरिक मार्गांपासून भांडवली बाजाराकडे वळवला आहे.
मार्चअखेरच्या तिमाहीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 1.36 लाख कोटी मूल्याच्या समभागांची विक्री केली, तर भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जवळजवळ 1.9 लाख कोटी गुंतवले. या काळात देशांतर्गत विमा कंपन्यांनीदेखील 47 हजार, 538 कोटींची निव्वळ खरेदी केली आहे. भारतीय गुंतवणूकदारांमुळे भारतीय भांडवली बाजारातील पडझड रोखण्यात, बाजाराला यश आल्याचे दिसत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारांचा विश्वासदेखील वाढलेला दिसून येतो.
भांडवली बाजारातील गुंतवणुकीसाठी भारतीय गुंतवणूकदार उत्साही
सध्या भारतीय गुंतवणूकदारांमध्ये भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो. त्यामुळे सहाजिकच त्यांचे बाजारातील गुंतवणुकीचे प्रमाणदेखील वाढले आहे. म्युच्युअल फंडकडे भारतीय गुंतवणूकदारांची पसंती सर्वाधिक दिसते. पूर्वी म्युच्युअल फंडविक्रीसाठी आम्हाला गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचावे लागत असे. मात्र, आता गुंतवणूकदार स्वतःहूनच आमच्याकडे येतात. भारतीय गुंतवणूकदार पारंपरिक गुंतवणुकीबरोबरच शेअर्स, म्युच्युअल फंडासारख्या गुंतवणुकीच्या नव्या वाटा मोठ्या प्रमाणात स्वीकारत आहे, त्याचीच परिणीती म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांचा बाजारातील वरचष्मा ही आहे.
- अविनाश परब, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर