पाक-अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष पेटला; दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला

29 May 2025 19:45:26

Pakistan 𝐀𝐟𝐠𝐡𝐚𝐧𝐢𝐬𝐭𝐚𝐧 War

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (pakistan afghanistan border conflict)
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादाला योग्य धडा शिकवला. भारताच्या या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या सरकारनेही कौतुक केले. चीन, तुर्की, इराण सारखे देश वगळता इतर अनेक राष्ट्र पाकिस्तानच्या विरोधात भारताच्या पाठीशी उभे आहेत. अशातच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संबंध बिघडत चालले असून दोन्ही देशांच्या सैन्यातील तणाव वाढल्याचे दिसतेय. बरमाचा सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये संघर्ष चांगलाच पेटलाय.

हे वाचलंत का? : पीओके लवकरच स्वेच्छेने ‘घरवापसी’ करणार – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
मिळालेल्या वृत्तानुसार, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. हा परिसर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताला समांतर आहे. सीमेवर नव्या चौक्या तयार करण्यावरुन गेले काही काळ जो वाद सुरु होता तो विकोपाला गेल्याचे यावरून कळतेय. या संघर्षाबद्दल पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


स्थानिक माध्यमांनी माहितीनुसार, बलुचिस्तान-हेलमंद सीमेवर जवळपास २ तास गोळीबार सुरु होता. पाकिस्तानी सैन्यानं अफगाणी चौक्यांवर बॉम्ब डागले. त्यानंतर पाक सैन्याकडून नव्या चौक्यांचे काम थांबवण्यात आले. डुरंड लाईनवर कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानला नव्या चौक्या उभारु देणार नसल्याची स्पष्ट भूमिका अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने घेतली आहे. पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडेही तैनात करण्यात आल्याचे दिसतेय.

डुरंड लाईनवरुन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात जुना वाद आहे. पाकिस्तान डुरंड लाईनला आपली अधिकृत सीमा मानतो. मात्र यावर अफगाणिस्तानला आक्षेप आहे. अफगाणिस्तानमधील नागरी सरकार ते तालिबानपर्यंत कोणीही डुरंड लाईनला मान्यता देत नाही. अफगाणिस्तानात तालिबान सरकार आल्यानंतर सीमेवर तारा लावण्याचा मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये अनेकदा संघर्ष झाला.

Powered By Sangraha 9.0