नवी दिल्ली : (Shashi Tharoor warns Pakistan) 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत सरकारने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळं पाठवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळातील एका शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शशी थरूर यांनी महात्मा गांधींच्या वाक्याचा उल्लेख करत पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. "आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ,"असे थरूर यांनी पनामा येथील भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ठणकावून सांगितले.
"आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले"
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेचा जागतिक स्तरावरील प्रचाराचा एक भाग म्हणून थरूर पनामाला गेलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. यावेळी त्यांनी केलेल्या विधानाची चर्चा होत आहे. शशी थरूर म्हणाले की, "महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या साहसी नेतृत्वातून आपल्याला हे देखील शिकवले की, आपण आपल्या हक्कांसाठी नेहमी उभे राहिले पाहिजे आणि भीतीशिवाय जगले पाहिजे. भारतात आपल्याला आज दहशतवाद्यांच्या भीतीशी लढावे लागत आहे, ज्या लोकांना जग दहशतवादी म्हणते, त्यांना असे वाटते की, ते आपल्या देशात येऊन, निष्पाप लोकांना मारून आपण काही मोठे राजकीय किंवा धार्मिक उद्दिष्ट साध्य करत आहोत. मात्र कोणताही स्वाभिमानी देश अशा गोष्टींना बळी पडणार नाही. आता दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस संपले. इथून पुढे दहशतवादी हल्ला झाल्यास महात्मा गांधींचा हा देश दुसरा गाल पुढे करणार नाही, आम्ही त्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ," असे थरूर पुढे म्हणाले.
"दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचाही माग काढला पाहिजे"
"भारताने केवळ दहशतवाद्यांनाच नव्हे तर त्यांना मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचाही माग काढला पाहिजे. आंतरराष्ट्रीय वाद मिटवण्यासाठी दहशतवाद हा पर्याय असू शकत नाही. ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी इतर मार्ग आहेत. मात्र, अश्या स्वरुपाच्या दहशतवादी कारवाया अस्वीकार्य आहे", असेही ते म्हणाले. तसेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाईमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिलेल्या पाकिस्तानी सैन्यावरही त्यांनी टीका केली.