‘जेपी मॉर्गन’ तसेच ‘मॉर्गन स्टॅनली’ यांसारख्या जागतिक वित्त संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्था तसेच भारतीय बाजारांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवतानाच, भारताच्या वाढीबाबत नवनवे अंदाज वर्तवले आहेत. येत्या काही काळात भारतीय शेअर बाजारदेखील ऐतिहासिक असा लाखांचा टप्पा पार करेल, हा त्यातीलच एक अंदाज. त्यानिमित्ताने...
जे पी मॉर्गन’ने नुकतीच उदयोन्मुख बाजारपेठांबाबत आपली भूमिका बदलून त्यांना ‘ओव्हरवेट’ श्रेणीत ठेवले आहे. या निर्णयामागे अमेरिका-चीन व्यापार तणावात आलेली शिथिलता, तसेच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेला रुपया हे घटक कारणीभूत आहेत. ‘जेपी मॉर्गन’ने भारताबाबत चांगला दृष्टिकोन ठेवला असून, त्याला गुंतवणुकीच्या दृष्टीने ‘सुरक्षित आश्रयस्थान’ असेही संबोधले आहे. तसेच, जागतिक व्यापारयुद्धाच्या काळात भारत ही सुरक्षित बाजारपेठ असल्याचे नमूद केले आहे. या दृष्टिकोनामुळे भारतातील गुंतवणुकीसाठी सकारात्मक संकेत मिळत असून, भारताची आर्थिक वाढ, स्थिर चलन आणि नियंत्रित महागाई हे घटक विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत, असे म्हणावे लागेल. भारत म्हणूनच उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून उदयास येत आहे.
‘जेपी मॉर्गन’च्या या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक विकासाला आणखी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी ‘जेपी मॉर्गन’ने भारतीय शेअर बाजार येत्या काळात एक लाखांचा टप्पा पार करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय शेअर बाजारात होत असलेल्या उलाढाली या केवळ आर्थिक आकड्यांपुरत्या मर्यादित राहत नसून, त्या संपूर्ण देशाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक बनल्या आहेत. ‘मॉर्गन स्टॅनली’ने वर्तवलेला अंदाज हा भारताच्या अर्थकारणाची, स्थैर्याची आणि जागतिक गुंतवणूकदारांतील विश्वासाची साक्ष देणारा दस्तऐवज आहे, असे म्हणता येईल.
भारतीय बाजार तेजीकडे झेपावत असून, ती केवळ एकदिवसीय तेजी नाही, तर मागील काही सत्रांतील अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात आलेली ही तेजी म्हणजे, भारतीय अर्थव्यवस्थेतील दीर्घकालीन बळकटीचे स्पष्ट संकेत आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदार केवळ वर्तमान परिस्थितीवर नव्हे, तर देशाचे भवितव्य विचारात घेऊन जोखीम घेत असतात. ‘मॉर्गन स्टॅनली’सारख्या जागतिक वित्तसंस्थेनेही हाच विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ‘बुल केस’ अर्थात बाजापात सकारात्मकता कायम राहिल्यास, ‘सेन्सेक्स’ एक लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार करू शकेल, असेही त्यांनी म्हटले आहे. ही केवळ एक संख्या नसून, ती भारताच्या आर्थिक वाटचालीतील आत्मविश्वासाची नवनवीन शिखरे गाठण्याची तयारी म्हणता येईल.
गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारने राबवलेली उत्पादन आधारित वाढ, डिजिटायझेशन, नवोद्योगांसाठीचे देशांतर्गत पूरक वातावरण, गुंतवणूकदारांसाठी एक खिडकी व्यवस्था आणि अब्जावधी डॉलर्सच्या पायाभूत सुविधांसाठी केलेली मोठी गुंतवणूक या सर्वांचा प्रभाव आता भारतीय बाजारातही स्पष्टपणे दिसू लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आर्थिक सुधारणांची जी दिशा ठरवली आहे, तिचा बहुआयामी फायदा देशाला मिळतो आहे. अर्थव्यवस्था ढासळली, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली अशा घोषणांद्वारे केंद्र सरकारवर विरोधक सातत्याने टीका करत आले आहेत.
विरोधासाठी विरोध हेच त्यांचे धोरण राहिले आहे. मात्र, जागतिक संस्था, गुंतवणूकदार आणि एजन्सीज जेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर विश्वास व्यक्त करतात, तेव्हा या आरोपांतील फोलपणा उघड होतो. शेअर बाजार हा काही कोणाच्या भाषणावर चालत नाही, तर तो आर्थिक नीतीवर आणि नियोजनावर विश्वास ठेवूनच निर्देशांक दाखवतो. अमेरिका-चीन व्यापार तणाव, डॉलरची कमकुवत स्थिती, युक्रेन युद्धाचे आर्थिक पडसाद अशा अनेकार्थाने अस्थिरतेने व्यापलेल्या आंतरराष्ट्रीय अर्थविश्वात भारत एक स्थिर, प्रगतिशील आणि विश्वासार्ह अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत आहे. जागतिक कंपन्यांसाठी ‘चीन प्लस वन’ धोरणामुळे भारताला विशेष फायदा मिळत आहे आणि यामुळेच ‘जेपी मॉर्गन’, ‘गोल्डमन’, ‘यूपीएस’, ‘मॉर्गन स्टॅनली’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय नामांकित वित्त संस्थांकडून भारताला विशेष श्रेणी मिळत असल्याचे दिसून येते. ‘मूडीज’ या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने भारताचा वाढीचा दर 6.3 टक्के राहील, असे म्हणूनच म्हटले होते.
‘मॉर्गन स्टॅनली’ने आपल्या अहवालात जो धोरणात्मक वातावरण अधिक अनुकूल असल्याचा उल्लेख केला आहे, तो अत्यंत अर्थपूर्ण आहे. सरकारने अलीकडील काळात केलेल्या सुधारणांमुळे भांडवली बाजारासाठी मजबूत संरचना निर्माण झाली आहे. बँकिंग क्षेत्रातील सुधारणा, एनबीएफसी क्षेत्राला दिलेली मजबुती, ‘सेबी’मार्फत पारदर्शकता वाढवणे, ‘आयपीओ’चा ‘बूम’ आणि डिजिटल व्यवहारांचा प्रसार हे सगळेच घटक देशांतर्गत बाजाराला स्थैर्य देत आहेत.
देशात कायम असलेली राजकीय स्थिरता अर्थव्यवस्थेला तसेच, देशांतर्गत बाजारांना स्थिरता देताना दिसून येते. धोरण सातत्य का महत्त्वाचे असते, हेच यातून अधोरेखित होते. ‘एमएसएमई’ आणि ग्रामीण भागातील गुंतवणुकीला मिळत असलेली चालना अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी साहाय्यभूत होत आहे. मध्यम आणि लघु उद्योग, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था हे भारताच्या आर्थिक प्रगतीचे मूळ घटक आहेत. त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याने भारतीय शेअर बाजारही वाढत आहेत. देशातील मध्यमवर्गीय, सेवानिवृत्त नागरिकांच्या बचती बाजारात येण्यासाठी विश्वासार्ह वातावरण देशात निर्माण होत आहे. शेअर बाजार हा केवळ शहरांपुरता मर्यादित न राहता, तुलनेने लहान शहरांतील नागरिकही गुंतवणुकीत सहभागी होताना दिसून येत आहेत.
शेअर बाजार ही अर्थव्यवस्थेची नाडी असते, असे म्हणतात. आज भारताची ही नाडी ठणठणीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. जागतिक बाजारात भारताच्या आवाजाला अधिक महत्त्व प्राप्त होताना दिसून येते. ‘मॉर्गन स्टॅनली’चा अंदाज ही केवळ भविष्यवाणी नाही, तर भारताच्या आर्थिक नीतींवरील जागतिक विश्वासाचे प्रमाणपत्र आहे. या विश्वासाचे सोने करण्यासाठी देशांतर्गत धोरणांत सातत्य, पारदर्शकता आणि दीर्घदृष्टी ही आवश्यक अशीच. शेअर बाजाराचे उच्चांक हे केवळ आकड्यांचे प्रदर्शन नसून, राष्ट्राच्या आत्मबळाचे दर्शनही घडवणारे ठरतात.
- संजीव ओक