मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (India Bangladesh Operation Pushback) भारताने ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवत पाकिस्तानातील दहशतवादास चांगलाच धडा शिकवला. या अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अनेक तळही उध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने बांगलादेशी घुसखोरांविरोधात ऑपरेशन पुशबॅक सुरु केले आहे. बांगलादेशी-रोहिंग्यांच्या देशातील वाढत्या प्रमाणावरून उचलण्यात आलेले हे पाऊल आहे. या कारवाईअंतर्गत, तात्काळ कारवाई करून, घुसखोरांना निवडकपणे त्यांच्या देशात परत पाठवले जात आहे. आतापर्यंत सुमारे एक हजारहून अधिक बांगलादेशींना परत पाठवण्यात आले आहे. इस्लामिक कट्टरपंथींना मात्र या कारवाईमुळे चांगलेच पोटशुळ उठले आहे. त्यामुळे भारतीय सैन्य आणि केंद्र सरकार दोघांनाही बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतातून पकडलेल्या आणि परत पाठवलेल्या लोकांची कशाप्रकारे दुर्दशा झाली आहे, याचा एक अहवाल विरोधाच्या भावनेतून प्रकाशित करण्यात आला. भारतीय प्रशासनाने त्यांचा कसा छळ केला हे अहवालात दाखवले आहे. अहवालानुसार, ७ मे पर्यंत सुमारे १०५३ लोकांना सीमेपलीकडे परत पाठवण्यात आले. यामध्ये खगराछडीमध्ये १११, कुरीग्राममध्ये ८४, सिल्हेटमध्ये १०३, मौलवीबाजारमध्ये ३३१, हबीगंजमध्ये १९, सुनामगंजमध्ये १६, दिनाजपूरमध्ये दोन, चापैनवाबगंजमध्ये १७, ठाकूरगावमध्ये १९, पंचगढमध्ये ३२, लालमोनिरहाटमध्ये ७५, चुआडांगामध्ये १९, झेनाइदाहमध्ये ४२, कुमिल्लामध्ये १३, फेनीमध्ये ३९, सातखीरामध्ये २३ आणि मेहेरपूरमध्ये ३० जणांचा समावेश आहे.
'ऑपरेशन पुशबॅक' ही एक नवीन रणनीती आहे ज्याचा उद्देश पूर्व सीमेवर पकडलेल्या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांवर त्वरित कारवाई करून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवून देणे. हे असे लोक आहेत जे अनेक वर्षांपासून भारतात बेकायदेशीरपणे राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या कारवाईअंतर्गत, पोलिसांच्या स्वाधीन करणे, एफआयआर नोंदवणे, न्यायालयात हजर करणे, खटला चालवणे आणि नंतर हद्दपारीच्या प्रोटोकॉल अंतर्गत परत पाठवणे ही पारंपारिक प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आता भारतीय सुरक्षा दल घुसखोरांना ताबडतोब सीमेपलीकडून बांगलादेशच्या दिशेने ढकलत आहेत. वेळ आणि संसाधने वाचवण्यासाठी आणि बेकायदेशीर घुसखोरीवर तात्काळ परिणाम होण्यासाठी हे केले जात आहे.