कुत्रा चावल्याच्या प्रकरणात मालकाला चार महिन्यांची शिक्षा

29 May 2025 18:55:39
Dog bite case: Owner sentenced to four months in prison

मुंबई: वरळीतील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये २०१८ साली घडलेल्या एका घटनेने पाळीव प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला आहे . विजय गोसावी हे त्यांच्या हस्की जातीच्या कुत्र्यासह लिफ्टमध्ये होते, त्याच वेळी शेजारी राहणाऱ्या प्राची मेननही त्या लिफ्टमध्ये होत्या. अचानक त्या कुत्र्याने प्राची मेनन यांच्यावर झडप घालून त्यांच्या पायाला चावा घेतला. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत होऊन तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेनंतर प्राची मेनन यांनी वरळी पोलीस ठाण्यात विजय गोसावी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली. या प्रकरणातील साक्षी व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. सरकारी वकिलांनी गोसावी यांनी निष्काळजीपणा दाखवला असल्याचे ठामपणे सांगितले. लिफ्टसारख्या बंद आणि सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याला मोकळे सोडणे, त्याच्यावर नियंत्रण न ठेवणे ही चूक होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मेट्रोपोलिटन दंडाधिकारी न्यायालयाने विजय गोसावी यांना चार महिन्यांची सक्तमजुरी आणि ४,००० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. "पाळीव प्राण्यांचे वर्तन ही मालकाची जबाबदारी असून, सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे," असे स्पष्टपणे न्यायालयाने नमूद केले.

गोसावी यांनी हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घटनेनंतर अनेक सोसायट्यांमध्ये पाळीव प्राण्यांसंदर्भात नियम अधिक कठोर करण्यात आले आहेत. लिफ्टमध्ये प्राण्यांना मोकळे न सोडणे, पट्टा वापरणे आणि नियंत्रणात ठेवणे या बाबतीत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ही घटना आणि त्यावर दिलेला निर्णय सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांमध्ये पाळीव प्राण्यांच्या देखरेखीविषयी जागरूकता वाढवण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0