मुंबई : २०२४-२५ मध्ये राज्यात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली असून ही गुंतवणूक गेल्यावर्षीपेक्षा ३२ टक्के अधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट करत २०१५-१६ पासून तर २०२४-२५ पर्यंतची परकीय गुंतवणूकीची आकडेवारीच जाहीर करून टाकली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च २०२५) आकडेवारीसुद्धा आता जाहीर झाली असून आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने १ लाख ६४ हजार ८७५ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही ४ लाख २१ हजार ९२९ कोटी रुपये इतकी आहे.
हे वाचलंत का? - आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींना? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री फडणवीसांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गेल्यावर्षीचा विचार केल्यास महाराष्ट्रात यावर्षी ३२ टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या ९ महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील," असे ते म्हणाले.
वर्ष २०१५-१६ ते २०१४-२५ पर्यंत झालेली गुंतवणूकीची आकडेवारी!
२०१५-१६ : ६१,४८२ कोटी
२-१६-१७ : १,३१,९८० कोटी
२०१७-१८ : ८६,२४४ कोटी
२०१८-१९ : ५७,१३९ कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी
२०२०-२१ : १,१९,७३४ कोटी
२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी
२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी
२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी
२०२४-२५ : १,६४,८७५ कोटी